रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हयाचे खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तौक्ते चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्या घरांना व झाडांना निसर्ग चक्रीवादळाच्या निकषाप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी, अशा विनंतीचे निवेदन दिले आहे.
दि. १६ मे रोजी कोकण किनार पट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ले, मालवण, देवगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आणि रत्नागिरी येथील किनारपट्टी भागासहित सह्याद्री घाटमाथ्याजवळील अनेक गावांना तौक्ते चक्रीवादळाचा फाटक बसला आहे. नारळ, आंबा, फणस, सुपारी ई. हजारो झाडे उन्मळून पडल्याने या फळांचे उत्पादन पूर्णपणे नष्ट झाले आहे. शेकडो घरांवर मोठी झाडे पडल्याने राहती घरे व गुरांचे गोठे उद्धवस्त झाले आहेत. मच्छिमारांनी होड्या नांगरल्या परतू वादळाच्या जबरदस्त तडाख्याने होड्या वाहून गेल्या व खडकांवर आदळून फुटल्या. दुर्दैवाने देवगड येथील आनंदवाडी बंदरातील नांगरलेल्या बोटींवरील काही खलाशी अद्यापही बेपत्ता आहेत.
तरी या साऱ्या नुकसानीचा विचार करता तौक्ते चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्या घरांना व झाडांना निसर्ग चक्रीवादळाच्या निकषाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती खा. विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे