(निवोशी-गुहागर/उदय गणपत दणदणे)
कोकणात गुहागर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पालशेत-निवोशी कार्यक्षेत्र निवोशी येथील “शिसरोंडी” वनराईतील धबधबा पर्यटकांचे विशेष आकर्षक ठरत आहे. पावसाळा आणि त्यात श्रावण महिना सुरू झाला की, धबधब्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी तरुणाईची या ठिकाणी विशेषतः गर्दी पाहायला मिळते. श्रावण महिन्यात येथील डोंगर वनराई हिरवळ शालूने, सोनेरी किरणांनी सजलेली आपल्याला पाहायला मिळते. कातळ परिसर, पाऊल वाटा, रानफुलांनी बहरलेलं निसर्ग सौंदर्य. वाऱ्याची हलकी झुळूक पर्यटकांना अगदी भुरळ घालत असते.
अनेकांच्या मोबाईलमध्ये या सौंदर्याचा अचूक नजराणा टिपला जातो, तर अनेक युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून या धबधब्याची विस्तृत माहिती व्हिडिओ स्वरूपात प्रसारित होत असते. धबधब्याला लागुनच अश्मयुगीन गुहा आहे, साधारण दहा-पंधरा वर्षापूर्वी याठिकाणी अश्मयुगीन काळातील अवजारे सापडली होती, ही गुहा पाहण्याचीही पर्यटकांची इच्छा पूर्ण होऊन जाते.
मात्र या धबधब्याचे आनंद लुटताना काही सूचनांचे पालन करणे विशेष काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. धबधब्याच्या ठिकाणी जाणारी पाऊल वाट ही संपूर्ण कातळस्थितीत असुन पावसाळ्यात संपूर्ण परिसरात शेवाळी तयार होत असते. त्यामुळे चालताना पाय घसरून पडणार नाही याची खबरदारी घ्यावी. कातळ परिसर असल्याने सरपटणारे प्राणी उदा. विंचू, सर्प, अन्य विषारी जीवाणूंकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. धबधब्याच्या प्रमुख जल प्रवाहाच्या ठिकाणी जाणे टाळावे व सदर धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे फोटो काढणे यांचा मोह टाळावा. आपण सुरक्षित आहोत अशा ठिकाणीच सेल्फी-फोटो टिपावेत. ज्यांना पोहता येत असेल त्यांनीच शक्यतो डोहात उतरण्याचे धाडस करावे. आपणास सदर परिसराची माहिती नसल्यास निवोशी गावातील जळपास राहणाऱ्या व्यक्तीची मदत घ्यावी. आपल्या सोबत पाण्याची बाटली असावी असे आवाहन केले आहे.
ग्रामस्थांच्या निदर्शनास प्रामुख्याने समोर आलेल्या घटनांच्या अनुसरून सदर आसपासच्या परिसरात प्रेमीयुगलांनी अशोभनीय असे कोणतेही वर्तन करू नये. मद्यप्राशन करून कोणत्याही प्रकारच्या काचेच्या बॉटल फोडू नयेत अथवा इतर प्लास्टिक कचरा करू नये कारण सदर रान माळावर जनावरे चरत असतात. शिवाय स्थनिक ग्रामस्थ शेती करत असल्यामुळे सदर काचेचे तुकडे शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या पायाला दुखापत होत आहेत. आपण एक जबाबदार नागरिक म्हणून या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून निवोशी ग्रामस्थ जनतेला सहकार्य करावे एवढीच मापक अपेक्षा.
शिसरोंडी पर्यटनस्थळाच्या प्रसिद्धीमुळे भविष्यात शिसरोंडी धबधब्यामुळे निवोशी गावाला नवीन ओळख प्राप्त होतेय याचे ग्रामस्थांनामध्ये अधिक समाधान आहेच. श्रावणातील मेघ गर्जनेत आपण आणि आपलं अवघ कुटुंब या निवोशी गावातील नयनरम्य निसर्गाचा आणि शिसरोंडी धबधब्याचा मनसोक्त आनंद लुटताना अवघ्या निवोशी गावची ख्याती सर्वदूर होत आपल्या हृदयी कप्यात आठवणी साठवल्या जातील हिच निवोशी गावची खरी ओळख होय !
उदय गणपत दणदणे
मोबाईल नंबर -८२७५६२७६३६