(रत्नागिरी)
तालुक्यातील निवळी येथील दळवी कॅश्यूच्या दुकानात 1 लाख 99 हजार 700 रुपयांच्या किंमतीचे काजूगरांची पाकिटे चोरून नेल्याची घटना मंगळवार 26 एप्रिल रोजी रात्री 9.15 वा. च्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश परशुराम दळवी (49, आरोग्यमंदिर, रत्नागिरी) यांचे निवळी येथे दळवी कॅश्यू दुकान आहे. या दुकानाच्या डाव्या बाजूच्या भिंतीचे दगड तोडून दुकानातील काजूगरांच्या पाकिटांची चोरी झाली. यामध्ये 22 हजार रु. किंमतीची 1 किलो वजनाची काजूची 20 पाकिटे, 15 हजार रुपये किंमतीची अर्धा किलो वजनाची 30 काजूची पाकिटे, 3 हजार 700 रुपये किंमतीची 200 ग्रॅम वजनाची 20 पाकिटे, 27 हजार 500 रुपये किंमतीची 500 ग्रॅम वजनाची 50 काजूची पाकिटे, 47 हजार 500 रुपये किंमतीची एक किलो वजनाची 50 पाकिटे, 42 हजार रुपये किंमतीची एक किलो वजनाची 56 पाकिटे, 42 हजार रुपये किंमतीची 1 किलो वजनाची 60 पाकिटे असा एकूण 1 लाख 99 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
याबाबतची फिर्याद संदेश दळवी यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार अज्ञातावर भादविकल 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.