(जाकादेवी/वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जयगड ते निवळी रस्ता हा ऐन पावसामध्ये खड्डेमय झाला असून या रस्त्यावरून वाहने चालवणे फार जिकरीची झाले आहे. निवळी- मासेबाव- नरबे – तरवळ -जाकादेवी -चाफे-खंडाळा मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाच्या पाण्याने खड्डे अक्षरशः भरून गेले असून वाहन चालकांना वाहन चालवणे फार मोठे धोक्याचे बनले आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षित बाबीला विरोध करण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी आग्रहाने पुढे येण्याचे आवाहन राई गावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते राजेश सावंत यांनी केले आहे.
निवळी ते जाकादेवी- जयगड या रस्त्यावर रात्रंदिवस सतत वाहतूक सुरू असते, मात्र लोकप्रतिनिधी किंवा कोणताही पुढारी या रस्त्याविषयी आवाज उठवत नाही. अनेक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी याच मार्गाने प्रवास करतात. त्यांना ही गंभीर समस्या दिसत नाही का? अनेक वाहन चालकांला हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या वर्षी या रस्त्याची दुर्दशा भयंकर होती. खराब रस्त्यामुळे गतवर्षी एकाचा नाहक बळी गेला. त्यानंतर अनेक यंत्रणांनी आवाज उठवल्यानंतर या रस्त्याचे काम सुरू झाले. मात्र या पावसामध्ये हा रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीला अडथळा बनला आहे.
जिंदालची प्रचंड मोठी अवजड वाहनांनी या रस्त्याची अक्षरशः चाळण केली आहे. क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक अहोरात्र सुरू आहे.तरीही या गोष्टीकडे कोणीही लक्ष का देत नाही? तरी निवळी मार्ग जयगड रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे लवकरात लवकर बुजवावे आणि हा रस्ता वाहनांसाठी सुस्थितीत करावा अशा प्रकारची आग्रही मागणी राई गावचे सुपुत्र व दक्ष नागरिक राजेश सुर्यकांत सावंत यांनी प्रसिद्धी माध्यमाच्याद्वारे प्रशासनाकडे केली आहे.