(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई गोवा महामार्गावरील निवळी घाटातील कोकजेवठार येथे टेम्पो व दुचाकीमध्ये समोरासमोर धडक झाली. हा अपघात रविवारी (दिनांक 3 सप्टेंबर 2023) सायंकाळीं साडेसहाच्या सुमारास झाला. या अपघातात दुचाकी चालकासह मागे बसलेल्या महिलेला गंभीर दुखापत झाली.
गणेशउत्सव काही दिवसांवर आहे. या पार्शवभूमीवर महामार्गाची एक लेन गणेश उत्सवापूर्वी कोणत्याही परिस्थितीत चालू करण्याचे बांधकाम मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. हातखंबा ते बावनदी या भागात तुकड्यात लेन चालू आहे. तुकड्यात चालू असलेल्या लेन सर्व्हिस रोडला जोडण्यात आल्या आहेत.
लेन जोडलेल्या ठिकाणी हा अपघात झाला. रत्नागिरीतून टेम्पो चालक निलेश दत्तात्रेय पोद्दार (वय 28 वर्ष राहणार कोल्हापूर) हा संगमेश्वरच्या दिशेने जात होता. टेम्पो (क्रमांक MH-09-FL-9139) कोकजेवठार येथे आला असता टेम्पो विरुद्ध बाजूला जाऊन समोरून येणाऱ्या दुचाकीला (क्रमांक MH-44-A-3809) जोरदार धडक दिली. देवरुखातून दुचाकी चालक अशोक घुले (वय वर्ष 23 रा.जे के फाईल रत्नागिरी) आणि मागे बसलेल्या राधिका चौरे (वय वर्ष 45 रा. जे के फाईल रत्नागिरी) रत्नागिरीच्या दिशेने येत होतें. टेम्पो चालकाने विरुद्ध दिशेला जाऊन दुचाकीला धडक दिल्यानंतर पाच ते सहा फूट दुचाकी फरफटत न्हेली. या अपघातात दुचाकी चालकाच्या डोक्याला जोराचा मार लागला तसेच मागें बसलेल्या महिलेला देखील छाती व डोक्याला गंभीर दुखापत झाली.
या अपघाताची माहिती मिळताच तत्काळ हातखंबा वाहतूक पोलीसांसह श्री नरेंद्रचार्य महाराज संस्थांची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. अपघातातील जखमींना रुग्णवाहीकेतून उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर अपघातस्थळी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे अंमलदार यांनी भेट दिली व पुढील कार्यवाही सुरू केली.