(रत्नागिरी)
तालुक्यातील निवळी येथील इसार पेट्रोलपंप येथे उभा असलेला टाटा कंपनीचा 10 चाकी डंम्पर (क्र.एम.एच.08 अेपी 2764) हा १४ मे २०२३ रोजी अज्ञाताने चोरून नेला होता. याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत समांतर तपास सुरू होता. सदर चोरीस गेलेला डंपर शोधण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.
या गुन्हयातील आरोपीला कर्नाटक राज्यातून अटक करण्यात आली आहे. लक्ष्मण उर्फ बाळु नामदेव चवरे (वय २२ रा. चवरे वस्ती, पेनुर, ता.मोहोळ, जिल्हा सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दिनांक २२ मे २०२३ रोजी गाणगापूर ता. अफजलपूर, जिल्हा कलबुर्गी, राज्य कर्नाटक या ठिकाणावरून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला डंम्पर, गुन्हा करताना वापरण्यात आलेली कार व इतर साहीत्य असा एकूण 28, 63,200/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
अटकेतील आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात गणेश अरुण पाटील आणि समाधान शिवाजी चवरे (दोन्ही रा. पेनुर ता. मोहळ, जि. सोलापूर) हे दोघे त्याच्यासोबत असल्याची माहीती आरोपीने दिलेली आहे. सोबत असणारे दोन्हीं व्यक्ती सराईत गुन्हेगार असून त्यांचा देखील शोध पोलिसांकडून सुरू आहे. आरोपी व या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील कार्यवाहीकरीता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्यातील कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी तपास पथकामधील सहाय्यक पोलीस फौजदार संजय कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सर्वश्री शांताराम झोरे, विजय आंबेकर, योगेश नार्वेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांनी केली.