(मुंबई)
ठाकरे आणि शिंदे गट सध्या निवडणूक आयोगाच्या “शिवसेना”बाबतच्या निकालाची वाट पाहत आहेत. ठाकरे आणि शिंदे गटाचा फैसला सध्या निवडणूक आयोगाच्या कचेरीत आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून कागदपत्रे जमा करण्यासाठी धावपळ सुरु आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या जवळपास ११ लाख प्रतिज्ञापत्रांपैकी अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद केल्याचे, तसेच निवडणूक आयोगाने जो काही मजकूर ठरवून दिला होता त्या प्रमाणे प्रतिज्ञापत्रे न दिल्याच्या बातम्या विविध वृत्त माध्यमांनी दिली आहेत. निवडणूक आयोगाचे हे नियम पाळण्यात न आल्यानेच ही प्रतिज्ञापत्रं नाकारण्यात आली असून उर्वरित साडे आठ लाख प्रतिज्ञापत्रं स्वीकारण्यात आल्याची माहिती बातमीत देण्यात आली होती.
मात्र याबाबत शिवसेनेच्या दोन्ही गटातील कोणत्याही नेत्याने अद्याप याबाबत प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे खरेच बाद केली का? याबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाला होती. मात्र शिवसेना युवानेते आदित्य ठाकरेंनी यावर खुलासा केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, ठाकरे गटाची प्रतिज्ञापत्रे बाद केल्याचे वृत्त खोटे असून यावर विश्वास ठेवू नका. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी ही माहिती दिली. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ११ लाख प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली होती. यातील अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद झाल्याच्या वृत्ताबाबत विचारलं असता आदित्य ठाकरेंनी संबंधित बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे. तसेच त्या बातमीवर विश्वास ठेवू नका, असं आवाहनही आदित्य ठाकरेंनी केलं.
दरम्यान, आदित्य ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र सोडलं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? हे देवालाच माहीत आहे, या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेताना आदित्य ठाकरे म्हणाले की,महाराष्ट्रात खरा मुख्यमंत्री कोण आहे, हे ही देवालाच माहीत आहे. खोके सरकार निवडणुकीला तयार नाही, ते निवडणुकीला घाबरतात. ४० गद्दार आमदार खरंच निवडणुकीला घाबरत नसते आणि त्यांच्यासोबत जनमत असतं तर त्यांनी राजीनामे दिले असते आणि नव्याने निवडणुकीला सामोरे गेले असते, अशी टीका आदित्य ठाकरेंनी यावेळी केली.