(चिपळुण / प्रतिनिधी)
तालुक्यातील ओमळी येथील नीलिमा चव्हाण हिच्या व्हिसेरा अहवालात कोणतेही विषारी द्रव्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता तिचा नेमका मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. ओमळी ता. चिपळूण येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर अनेक तर्कवितर्क लढविले जात हाेते. मात्र, तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट हाेण्यासाठी पाेलिसांना व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा हाेती.अहवाल शुक्रवारी (११ ऑगस्ट) पाेलिसांना प्राप्त झाला. या अहवालानुसार तिच्या शरीरात काेणतेही विषारी द्रव्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दापाेली येथील एका बॅंकेत कामाला असणारी नीलिमा ओमळी येथील गावी जाण्यासाठी २९ जुलै राेजी निघाली हाेती. मात्र, तिचा १ ऑगस्ट राेजी दाभाेळ खाडीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली हाेती. त्यानंतर तिच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लढविले जात हाेते. मात्र, पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन प्राथमिक तपासानुसार तिचा घातपात नसल्याचे स्पष्ट केले हाेते. तपासात त्यांनी १०४ साक्षीदारही तपासल्याचे सांगितले हाेते. त्याचवेळी व्हिसेरा अहवालानुसार सर्व चित्र स्पष्ट हाेईल, असेही त्यांनी सांगितले हाेते. त्यामुळे पाेलिसांना व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा हाेती. हा अहवाल तातडीने मिळावा, अशी विनंतीही पाेलिसांनी केली हाेती. हा अहवाल शुक्रवारी पाेलिसांना प्राप्त झाला असून, तिच्या शरीरात काेठेही विषारी द्रव्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच शवविच्छेदनाच्या अहवालानुसार तिच्या शरीरावर काेठेही जखमा नसल्याचे स्पष्ट झाले हाेते. त्यामुळे आता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे.
दरम्याने नीलिमा चव्हाण यांच्या नातेवाईकांनी ती काम करीत असलेल्या बँकेच्या एका कर्मचाऱ्याविरुद्ध माहिती पोलिसांना दिली आहे. तिच्या मृत्यूनंतर हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू करून १०४ साक्षीदार तपासले. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल मागवून घेतला असता तिच्या अंगावर कोठेही जखमा नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नीलिमाचा नेमका मृत्यू कशामुळे झाला, याचे कारण गुलदस्त्यातच आहे. पोलिसांनी सखोल तपास सुरूच ठेवला आहे. मात्र, आता शवविच्छेदनाच्या अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे.
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आता पोलिसांनी नीलिमा चव्हाण ज्या बँकेत काम करत होती, त्या बँकेतील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे आता नीलिमाचा बुडून मृत्यू झाला असला तरीही तिच्यावर हे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ का आली याचा शोध आता पोलीस घेत आहेत. मानसिक स्थिती ठीक नसल्यानेच नीलिमाने टोकाचे पाऊल उचलले असल्याच्या प्राथमिक निष्कर्षापर्यंत पोलीस यंत्रणा पोहोचली आहे. त्यामुळे आता हा मानसिक ताण नक्की कसला होता याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या सगळ्या प्रकरणात युद्धपातळीवर पोलीस तपास सुरू आहे.
या प्रकरणात बँकेतील कर्मचाऱ्यांचा कोणताही संबंध असल्याची माहिती अद्याप नाही. नीलिमावर असलेला मानसिक दबाव कसला व कोणाचा या दिशेने आता या प्रकरणात पोलिसांनी माहिती घेण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. स्टेट बँकेच्या दापोली शाखेत कंत्राटी कर्मचारी तत्त्वावर कार्यरत असणारी नीलिमा चव्हाण डिमॅट अकाउंट उघडण्याचे काम करायची, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. खेड, चिपळूण, दापोली, रत्नागिरी या चार शाखांमध्ये डिमॅटची जबाबदारी हाताळण्यासाठी कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये निलिमाचा समावेश होता. दरम्यान आता या प्रकरणात नीलिमाच्या घरच्यांनी एका कर्मचाऱ्याचे नाव पोलिसांकडे दिल्याची माहिती आहे. आता त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी कोणती वस्तुस्थिती समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.