( खेड / इक्बाल जमादार )
साखरपुड्याला दोन दिवस शिल्लक असताना एका तरुणाला मृत्यूने गाठल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ही काळजाला भिडणारी घटना घडली आहे चिपळूण शहरातील खेंड येथे. साई दिलीप खेडेकर (31, चिपळूण) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
चिपळुणातील या खेडेकर कुटुंबाच्या बाबतीत सुखाचे क्षण हिरावणाऱ्या दोन घटना घडल्या आहेत. वर्षभरापूर्वी साई याचे वडिलांचा कोरोनात मृत्यू झाला होता. या धक्क्यातून कुटुंब सावरत असतानाच आनंदाच्या क्षणीच नियतीने दुसरा डाव टाकला आणि सारे होत्याचे नव्हते झाले.
साई हा नोकरी निमित्त मुंबई येथे कंपनीत कामाला होता. तेथेच तो आईसोबत रहात होता. नुकतेच त्याचे लग्न ठरले होते आणि दोन दिवसावर त्याचा साखरपुडाही होता. या साखरपुड्याच्या तयारीसाठी तो चिपळूण खेंड येथे आई सोबत आला होता. चिपळुणात आल्यावर त्याने साखरपुड्याला आवश्यक सर्व सामानाची खरेदी केली. मित्र परिवार, नातेवाईकांना निमंत्रण ही दिले. साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच काल सोमवारी सकाळी त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी शहरात पसरताच साऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. वर्षापूर्वीच वडिलांचे निधन आणि आता मुलाचे निधन झाल्याने खेडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.