(संगमेश्वर / प्रतिनिधी)
वाहनावरील नियंत्रण सुटून कार ५० फूट खोल दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना रविवारी (२० ऑगस्ट) सकाळी १०:०० वाजता घडली. हा अपघात देवरूख साखरपा मार्गावरील वांझोळे येथे झाला. या अपघातात कोणाला गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, वाहनाचे नुकसान झाले आहे.
लालबाग येथील कारचालक गणपतीपुळेला जाण्यासाठी देवरूख- साखरपा मार्गावरून प्रवास करत होते. वांझोळे येथे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट ५० फूट खोल दरीत कोसळली. हा प्रकार निदर्शनास येताच ग्रामस्थ, रिक्षाचालक साखरपा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. कारमध्ये अडकलेले प्रवासी काचा फोडून बाहेर आले. ग्रामस्थांनी रस्सीच्या साहाय्याने या प्रवाशांना दरीतून बाहेर काढले. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने प्रवाशांना गंभीर दुखापत झालेली नाही. या अपघाताची नोंद पोलिस स्थानकात करण्यात आलेली नाही. त्यामुळे चालक व प्रवाशांची नावे मिळू शकलेली नाहीत.