(मुंबई)
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त करत नितीन देसाई यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. स्थानिक पोलिसांनी एनडी स्टुडिओमध्ये जात प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. परंतु आता कर्जतचे भाजपा आमदार महेश बालदी यांनी नितीन देसाईंच्या आत्महत्येच्या कारणांबाबत मोठा खुलासा केला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भाजप आमदार बालदी म्हणाले की, एक ते दीड महिन्यांपूर्वी माझी नितीन देसाई यांच्याशी भेट झाली होती. त्यावेळी ते आर्थिक विवंचनेत असल्याचं मला समजलं होतं. आज सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याचं मला समजलं आहे. नितीन देसाई यांनी कर्जतमधील स्थानिक मुलांनाही एनडी स्टुडिओत नोकऱ्या दिल्या होत्या. मात्र ते आर्थिक विवंचनेत असल्याने आत्महत्येचं प्राथमिकदृष्ट्या दुसरं कारण सध्या दिसत नाही. त्यामुळं आता पोलीस तपास त्या दृष्टीनेही सुरू आहे.
पुढे बोलताना आमदार बालदी म्हणाले, नितीन देसाई हे ज्यावेळी मला भेटले होते, त्यावेळी पुढचा चित्रपट येत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आपले चित्रपट चालत नसून आर्थिक गणितं बिघडत असल्याचंही नितीन देसाई यांनी सांगितले होते. त्यामुळं आता कर्जत पोलिसांच्या तपासातून काय समोर येणार?, याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे.