(मुंबई)
प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी 2 ऑगस्ट रोजी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. त्यांनी आर्थिक तणावातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. देसाईंच्या आत्महत्येनंतर घटनास्थळी सर्वप्रथम पोहोचलेल्या एका तरुणाने या प्रकरणी एक धक्कादायक माहिती दिली आहे. त्याच्या माहितीनुसार, देसाईंनी गळफास घेण्यापूर्वी दोरीने एक धनुष्यबाण बनवला होता. त्या धनुष्याच्या मध्यभागी उभे राहून त्यांनी स्वतःला जीवनप्रवास संपवला होता. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नितीन देसाई यांच्या आत्महत्येबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, नितीन देसाई हे माझे अतिशय जवळचे मित्र होते. त्यांना अनेक लोकांनी ब्लॅकमेल केले आहे. ब्लॅकमेल करणारे लोक मुंबई एमएमआरडीएशी संबंधित आहेत, असा दावाही आव्हाडांनी केला. त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. नितीन चंद्रकांत देसाई हे माझे अतिशय जवळचे मित्र होते. नितीन देसाईंनी कधीही रस्त्यावर डेकोरेशन केलं नव्हतं. पण त्यांनी पहिल्यांदा माझ्या गणपतीला 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावर भलंमोठं डेकोरेशन केले. ते नितीन देसाईंचं रस्त्यावरील पहिलं डेकोरेशन होते.
मागच्या तीन वर्षात नितीन देसाईंच्या ज्या आर्थिक उलाढाली झाल्या, त्या सर्व उलाढालींची कसून चौकशी व्हायला पाहिजे. तसेच दरम्यानच्या काळात त्यांच्या कुणा-कुणाशी भेटी झाल्या? कोण-कोण त्यांच्याविरोधात बोललं? या सगळ्याची माहिती घेतली पाहिजे आणि त्या सर्वांची चौकशी केली पाहिजे. या चौकशींमधून सत्य बाहेर आले पाहिजे. नितीन देसाईंना अनेकांनी ब्लॅकमेल केले आहे. ते ब्लॅकमेल करणारे कोण आहेत? याचा शोध पोलिसांनी घ्यायला पाहिजे.