(मुंबई)
सर्वोच्च न्यायालय लवकरच सत्तासंघर्षाबाबत निर्णय देणार असून, त्यानंतर महाराष्ट्रात भूकंप होणार अशी जोरदार चर्चा असतानाच या निकालाच्या आधीच मविआत हादरे बसू लागले आहेत. ठाकरे गटाने उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका सुरू केल्याने हे दोन्हीही पक्ष नाराज आहेत. याचे परिणाम येत्या काळात पाहायला मिळतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या लिखाणात म्हटले की, शरद पवार हे राजकीय वारस निर्माण करण्यास अपयशी ठरले आहेत. भाजपात जाण्यासाठी त्यांचे नेते बॅगा भरून तयार होते आणि त्यांच्यासाठी भाजपाने लॉजिंग बोर्डिंगची व्यवस्थाही केली होती. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे आज राष्ट्रवादीत संताप पसरला होता. अजित पवार यांनी यावर फारसे बोलणे टाळले तरीही छगन भुजबळ यांनी मात्र संतप्तपणे सवाल केला की, राष्ट्रवादीने मविआतून बाहेर पडावे असे संजय राऊत यांना वाटते का? राष्ट्रवादीतील अनेक नेते स्वबळासाठी समर्थ आहेत. संजय राऊत यांना मुद्दामहून हा विषय उकरून काढण्याची काय गरज आहे? ते आमच्यावर जेवढ लक्ष ठेवतात त्यापेक्षा शिंदे गटावर लक्ष ठेवले असते तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती.
काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनीही फटकारत म्हटले की, पवारांविषयी केलेले भाष्य योग्य नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही ठाकरे गटावर भडकले आहेत. उद्धव ठाकरे यांनी महाडच्या कालच्या सभेवेळी काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. यावर संतप्त प्रतिक्रिया देत नाना पटोले म्हणाले की, हे करू नका असे मी उद्धवजींना सांगितले होते तरीही त्यांनी ते केले. मविआ कमकुमत करण्याचे काम त्यांनी करू नये. त्यांच्या या कारवायांमुळे त्यांनी महाडमधून निवडणूक लढविली तरी आम्हीही येथे उमेदवार देणार आहोतच.
संजय राऊत यांनी यापूर्वीही अजित पवार यांना डिवचले आहे. त्यावेळी अजित पवार यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले होते की, ते ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत त्या पक्षाबद्दलच त्यांनी बोलावे. दुसर्या पक्षात त्यांनी लूडबूड करू नये. नाना पटोले यांनी राऊतांना इशारा देत चोंबडेगिरी करू नका, असे बजावले होते. तर जयंत पाटील यांनी मविआ टिकवायची असेल तर राऊतांवर बोलणार नाही, असे म्हटले होते.
संजय राऊत हे ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते आहेत. त्यामुळे ते जे बोलतात आणि जे लिहितात ती ठाकरे गटाची अधिकृत भूमिका समजली जाते. त्यांच्या वक्तव्यावरून मविआमध्ये फाटाफूट होण्याचा धोका समोर दिसत असतानाही उद्धव ठाकरे यांनी जाहीररित्या संजय राऊत यांचे म्हणणे एकदाही खोडून काढलेले नाही. किंबहुना संजय राऊत यांनी गप्प बसावे असेही त्यांना सूचित केलेले नाही. याचा अर्थ संजय राऊत यांच्या नावाने ठाकरे गटच आपली भूमिका मांडत आहे, असे सध्या चित्र आहे. यामुळेच त्यांच्या प्रत्येक वक्तव्याने मविआमध्ये निर्माण झालेला संताप वाढत जाऊन आगामी काळात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही