(संगमेश्वर / प्रतिनिधी)
आमदार किंवा खासदार यांच्याकडे अनेकवेळा खेपा मारूनही कामे होत नाहीत, तेव्हा गावकऱ्यांना पुढाकार घ्यावा लागतो. अशावेळी गावकरी एकत्र आले तर एकजुटीच्या माध्यमातून शासनाचा एकही पैसा न घेता खड्डे बुजवण्याचे काम करता येऊ शकते, याचे ठसठशीत उदाहरण संगमेश्वर तालुक्यातील निगुडवाडी येथील ग्रामस्थांनी दिले आहे.
तालुक्यातील निगुडवाडी हे गाव महिमत गडाच्या पायथ्याशी वसलेले आहे. अनेक पर्यटक या गावातून या मार्गावरून ये-जा करतात. मात्र, येथील निगुडवाडी फाटा ते निगुडवाडी गाव या तीन किलोमीटर रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. रिक्षाही चालवणे कठीण झाले आहे. गरोदर महिला, अन्य रुग्णांना उपचाराकरिता देवरूखला घेऊन जाणे धोकादायक बनले आहे.
या साऱ्या समस्यांचा विचार करता किमान मोठ-मोठे खड्डे तरी बुजवून घेण्यात यावेत, यासाठी गावकरी दोन महिन्यांपूर्वी माजी आमदार सुभाष बने यांच्याकडे गेले होते. त्यांनी खड्डे बुजवण्याच्या सूचना संबंधित विभागाला दूरध्वनीवरुन लगेचच केल्या होत्या. याकरिता पाच-सहा लाखांचा निधीही उपलब्ध करून द्यायलाही सांगितला. मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. त्यानंतर गावकऱ्यांनी स्थानिक आमदारांकडे म्हणणे मांडले. पण लगेच काही होणार नाही, मुख्यमंत्री निधीतून काहीतरी करू, असे आश्वासन गावकऱ्यांना मिळाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
शेवटी काय करावे हा विचार गावकऱ्यांना पडला. त्यांनी स्वतः अंग मेहनतीने काम करण्याचे ठरविले. मग गावातील तरुण एकवटले. कोणी टेम्पोने खडी आणली, कोणी डांबराची व्यवस्था केली, कोणी झाडलोट केली आणि मोठमोठे खड्डे भरायला सुरुवात केली. बघता-बघता मोठमोठे खड्डे बुजले गेले.
देवरुख ते कुंडी या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम बेलारी गावापर्यंत पूर्ण झाले आहे. तसेच माईनवाडी फाटा ते बेलारी याही रस्त्याचे डांबरीकरणाचे काम बेलारी गावापर्यंत पूर्ण झाले आहे. मात्र, निगुडवाडी फाटा ते निगुडवाडी गाव या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम यात अंतर्भूत नाही. याचा निगुडवाडी ग्रामस्थांनी निषेध केला आहे.