( संगमेश्वर / प्रतिनिधी )
ह. भ .प. आ.बा सावंत माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या ५५ विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. अत्यंत दुर्गम व ग्रामीण भागातून जवळपास चार-सहा किलोमीटर पायी चालत आपले शिक्षण पूर्ण करत असलेल्या गरजवंत विद्यार्थिनींची निकट जाणून नायशी विद्यालयातील ५५ मुलींना सायकल वाटप केले.
संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून मुलींच्या शिक्षणासाठी मोलाचे योगदान देणारी व सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे या योजनेअंतर्गत सायकलीचे वाटप करणारी सामाजिक संस्था सेंटर फॉर ट्रांसफार्मिंग इंडिया आयोजित ॲटलास कोपको कंपनीच्यावतीने चिपळूण तालुक्यातील अनेक शाळेंना २०० सायकलचे वाटप आयोजन सह्याद्री शिक्षण संस्थेच्या फार्मसी कॉलेजच्या सभागृहात नुकताच पार पडला.
या वितरण सोहळ्यासाठी सदर संस्थेचे व कंपनीचे पदाधिकारी अभिजीत पाटील प्रीती अहुजा, निमिषा जोशी ,श्रुती इंगोले, कुशाल जांबुलकर, देशपांडे साहेब उपस्थित होते तर अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे व आपल्या कोकणातील ग्रामीण मुलींना सायकल प्राप्त करून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणारे समन्वयक- विठ्ठलराव घाग, प्रवीण काजोलकर, तसेच सर्व पदाधिकारी विद्यार्थी-पालक, शिक्षक यांच्या समवेत पार पडला. या सायकल आपल्या शाळेतील जास्तीत जास्त मुलींना मिळाव्या यासाठी आपल्या संस्थने ,मुख्याध्यापक घाटगे सर व सर्व कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले.
सदर संस्था व कंपनीद्वारे नायशी विद्यालयाला मिळालेल्या ५५ सायकलींचे वाटप विद्यालयाच्या प्रांगणात संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष श्रीधर घाग सचिव प्रवीण खांडेकर सर्व संचालक मुख्याध्यापक श्री.आनंदा घाटगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना व पालकांना प्रदान करण्यात आले. आपल्या विद्यालयातील मुलींना सायकल मिळावीत म्हणून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करणारे शाळेचे माजी मुख्याध्यापक अनिल घाग सर यांचे संस्था व पालकानी आभार व्यक्त केले. वाटपानंतर पंचक्रोशीतून सदर सामाजिक संस्थेच्या व कंपनीच्या कार्याबद्दल,आपल्या नायशी संस्थेवर व शाळेबद्दल कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.