(दापोली)
उमेदवाराने नामनिर्देशनपत्रासोबत अपूर्ण व चुकीची माहिती दिल्याप्रकरणी दापोली नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांच्यासह शिवसेनेचे गटनेते रवींद्र क्षीरसागर व राष्ट्रवादीच्या नगसेविका सौ. बोत्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोलीतील वासिम मुकादम यांनी 18 ऑगस्ट रोजी तिघाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार दापोली नगर पंचायतीने पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये रवींद्र क्षीरसागर, खालीद रखांगे व सौ.बोत्रे यांनी प्रतिज्ञापत्रे नामनिर्देशन सोबत सादर केली आहेत. या प्रतिज्ञापत्रामध्ये क्षीरसागर यांनी 40 मालमत्ता दर्शवल्या आहेत. सर्व पोटहिस्से धरुन 442 मालमता आहेत. खालीद यांनी स्वतःच्या नावे असलेल्या 29 मालमत्तांपैकी 9 मालमता दुबार दाखवल्या आहेत व 6 मालमता अन्य व्यक्तीच्या नावावर आहेत. तसेच 3 मालमतांचे नंबर दापोली तालुक्यातील नाहीत. स्वतच्या 11 व पत्नीच्या 7 अशा एकूण 18 मालमत्ता प्रतिज्ञापत्रामध्ये दर्शवण्यात आल्या आहेत. सौ. बोत्रे यांनी 16 मालमत्ता दर्शवल्या असून सर्व पोटहिस्से धरुन 47 मालमत्ता आहेत.
या तिघांच्या मालमत्तांचे अहवाल जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याकडून मागवले होते. 3 अधिकाऱ्यांच्या प्राप्त तीनही अहवालानुसार वेगळीच माहिती पुढे आली आहे.