(रत्नागिरी)
रत्नागिरी – नागपूर महामार्ग काल रात्री नाणीज हायस्कुलजवळ खचल्याने तीन वाहने रुतलेली आहेत. दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या मोठं मोठया रांगा लागल्या आहेत. येथील रस्ता दुरुस्तीपर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली आहे.
मीऱ्या नागपूर महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. रस्ता अनेक ठिकाणी उखडून ठेवला आहे. यातच सध्या जिल्हाभर जोरदार पाऊसाला सुरुवात झाली आहे. संबधीत विभागाने पावसापूर्वी सर्व्हिस रोड सुस्थितीत ठेवणे गरजेचे होते. मात्र रस्ता उखडल्या ठिकाणी रस्तावर डांबरीकरणाचा थर लावून रस्ता चकाचक नवीन असल्याचे दिसून येत होते. मात्र संबधित विभागाचा अंधाधुंद कारभार पावसानेच उघडा केला. गुरुवारी रात्री साडे बाराच्या सुमारास दरम्यान हा रस्ता खचून सुरुवातीला एक ट्रक रुतून बसला त्यानंतर पुन्हा दोन वाहने याच ठिकाणी रुतली आहे. यामध्ये दोन ट्रक आणि एक एसटी अशी एकूण तीन वाहने रुतलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहेत. वाहने बाजूला करण्यासाठी क्रेन दाखल झाली होती. क्रेनही रुतल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. या सर्व प्रकारामुळे सर्व वाहने दुतर्फा अडकून पडल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी छोटी वाहने चोरवणे मार्गे सोडण्यास सुरुवात केली आहे. मोठी वाहने मात्र जाग्यावरच अडकून पडली होती. हा रस्ता दुरुस्त होईपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावरील वाहतूक लांजा- दाभोळ मार्गे वळविण्यात आली आहे.
या महामार्गावर काम सुरू आहे, संबधित विभागाला पावसाचा अंदाज नसल्याने चुकीच्या पद्धतीने खोदाई करून रस्ता उखडून ठेवला असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. तसेच या रस्त्यामधून मूळ नाले बुजले गेल्याने रस्ता खचण्याचे प्रकार घडत आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्रीपासून घटनास्थळी बघ्यांची गर्दी आहे. रस्त्यावर सारी माती वाहून आली आहे. त्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य आहे. यातूनच माणसांना ये-जा करावी लागत आहे. या चिखलातून अनेक दुचाकीस्वार घसरुन अपघात देखील होत आहेत.