(नाणीज / वार्ताहर)
नाणीज येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे नाथांचे माहेर ते सुंदरगड अशी आपल्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. आपल्या संस्कृतीचा ठेवा असणाऱ्या या लोककला जपण्याचा स्तुत्य उपक्रम येथे दरवर्षी राबविला जातो. आजच्या सहभागी लोककला, त्यातील कलावंत, त्यांचा उत्साह, त्यांना मिळणारा लोकांचा प्रतिसाद सारेच अवर्णनीय असे होते.
संस्थांतर्फे दरवर्षी संतशिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन व आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य यांची जयंती येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्साहात साजरी झाली. आजची शोभायात्रा त्याचे आकर्षण होते. यामध्ये महाराष्ट्रातील त्या त्या जिल्ह्यातील लोककला सादर करणारी पथके सहभागी झाली होती. त्याशिवाय कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, झारखंड या राज्याचे प्रतिनिधित्व करणारी पथके होती. जवळजवळ ६१ लोककलांची पथके सहभागी होती. त्यांची चार किलोमीटरची रांग होती. या लोककला पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांची प्रचंड गर्दी होती. सगळीकडे फक्त माणसेच माणसे असे दृश्य होते. यावेळी पथकांनी वेगवेगळे विषय हाताळले होते.
युवकांचा मोठा सहभाग-
शोभायात्रेत युवकांनी विभागवार युवक समित्या स्थापन केल्या होत्या. त्यांनी अनेक देखावे सादर केले. पश्चिम महाराष्ट्र युवा समितीने वारकरी संप्रदायाचा देखावा सादर केला. उत्तर महाराष्ट्राचा किसान देखावा, मुंबई युवाचा मिल कामगार व डबेवाला देखावा होता. गोव्याचे नंदी, शंकर, शिमगा नृत्य, कोकणातील आकर्षण शिमगोत्सव व पालखी, पूर्व विदर्भचे देव पंचायतन, पश्चिमचे सर्वधर्मसमभाव, संतसंग, मराठवाड्याचा पायी दिंडी सोहळा, नागपूरचे संत – महंत व श्री गजाजन महाराज देखाव्याने यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
वानर सेना-
संग्राम सेनेची वरसेना बालगोपालांचे आकर्षण होती. रामसेतुसाठी मोठमोठया शिळा घेऊन वानर चालले होते. त्यांनी मारलेल्या उड्यानी मुलांचे रंजन होत होते.
मैदानी खेळ प्रात्यक्षिके-
कोल्हापूरच्या अनेक तरुण- तरुणी मैदानी खेळांची प्रात्यक्षिके दाखवण्यात पटाईत आहेत. येथे त्यांनी ती सादर करून वाहवा मिळवली.
तुळजाभवानी गोंधळ-
तुळजाभवानी देवीचा गोंधळ उस्मानाबाद जिल्ह्याने सादर केला. धुळ्याचे आदिवासी नृत्य होते. वसई, दक्षिण अहमदनगर, अकोला, दक्षिण ठाणे व मुंबई येथील भजन मंडळे सहभागी होती. सातारचा भारत माता देखावा, नांदेडचे रामपंचायत होते. पश्चिम पालघर, पुणे, नाशिक, ठाणे व सोलापूरच्या ढोल पथकांनी वातावरण दणाणून सोडले होते. सांगलीच्या बँड पथकाने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
वाघ्या- मुरळी, टिपरी-
नाशिकचे जेजुरी गडावरील वाघ्या- मुरळीचे पथक ठेका धरायला लावत होते. लातूरचे माऊली, माऊली या गाण्यावरील टिपरी नृत्य असेच वेधक होते. जळगाव, बुलढाणा, हिंगोली, यवतमाळ येथील बंजारा नृत्ये सादर झाली.
विविधता हेच वैशिष्ट्य-
अनेक जिल्ह्यांतून लोककलेचे विविध प्रकार सादर झाले. त्यामध्ये बीडचा कृष्ण, वासुदेव, देवकी, कंस देखावा, उत्तर रायगडचे कोळीनृत्य, परभणीचा संत जनाई देखावा, नंदुरबारचे आदिवासी नृत्य, गडचिरोलीचे लेझीम पथक, भंडारा जिल्ह्यातील गजानन, साईबाबा देखावा, पालघरचे तारफा नृत्य, संभाजीनगरचे धनगरी ढोल पथक, गोंदियाचे ब्लड इन नीड व मरणोत्तर देहदान देखावा असे सारे प्रकार येथे होते.
अन्य राज्यांचे आकर्षक देखावे बंगलोरचे चंडी वाद्य पथक सहभागी झाले होते. बिदर तेलनगणचा खंडोबा बानूचा देखावा वेधक होता. गुजरातचा गरबा, उत्तर कन्नडचे यक्षगान शोभयात्रेचे आकर्षण होते.
श्री गजानन महाराज देखावा-
संतशिरोमणी गजानन महाराज वेशभूषा देखावा उत्तर अहमदनगरने सादर केला होता. सिंधुदुर्गने गजानन महाराज मूर्ती देखावा सादर केला होता. रत्नागिरीने आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य यांचा देखावा सादर केला होता. संत- महंत शोभायात्रेत- देशभरातील नामवंत आखाड्यांचे साधू- संत शोभयात्रेचे आकर्षण होते. सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये ते स्थानापन्न होते.
जगद्गुरुश्रींचा सहभाग-
शोभायात्रेत जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा रथ मध्यभागी होता. त्यात प.पू. कानिफनाथ महाराजही सहभागी होते. सर्वांना आशीर्वाद देत हा रथ पुढे सरकत होता. भाविक जाग्यावरूनच त्यांचे दर्शन घेत होते. शोभायात्रेच्या सुरुवातीला स्वागतासाठी नारायणी हत्तीण उभी होती. प्रत्येक जिल्हा पथकापुढे कलशधारी व निशाणधारी महिला, पुरुष सहभागी होते.
दरम्यान सप्तचिरंजीव महामृत्यूनंजय यागाची काल सांगता झाली. दोन दिवस सुरू असलेल्या आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. भाविकांसाठी २४ तास महाप्रसाद होता. शोभायात्रेत महामार्गावरील वाहतूक नियंत्रणास पोलिसांची मोठी मदत झाली. एस. टी महामंडळाने जादा बसेस सोडल्या होत्या.
(छायाचित्रे – सचिन सावंत, नाणीज)