( रत्नागिरी / प्रतिनिधी )
शहरालगतच्या नाचणे सहकारनगर येथे घर फोडून पावणेदोन लाखांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना 5 ते 7 नोव्हेंबर सकाळी 7.45 वा. च्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद डॉ. ताराचंद सिताराम पुजारी (72, व्यवसाय डेंटल क्लिनिक, सहकार नगर, नाचणे) यांनी शहर पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. ताराचंद पुजारी हे 5 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत बाहेर गावी गेले होते. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी ते घरी आले असता त्यांच्या घराचे मागील खिडकीचे लोखंडी गज कापून, तोडून, वाकवून अज्ञाताने घरात प्रवेश केला. तसेच बेडरुम कपाटातील सोन्या, चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 1 लाख 67 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. यामध्ये 48 हजारांची रोख रक्कम, 1 लाख 19 हजार 900 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने असा ऐवज लंपास केला.
ताराचंद पुजारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञातावर भादविकलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महाले करत आहेत.