(मुंबई)
भारताच्या नागरिकांची ओळख ही ‘हिंदुस्तानी’ म्हणूनच हवी आहे. ‘मोदी भक्त’ अशी त्यांची ओळख मी होऊ देणार नाही. मोदी सत्तेवर येऊन दहा वर्षे होतील तेव्हा गावागावात जाऊन विचारा की, दहा वर्षांत देशाची जितकी विल्हेवाट यांनी लावली त्यापेक्षा अधिक विल्हेवाट कुणी लावू शकतो का? असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी पदाधिकार्यांच्या सभेत रविवारी बोलताना केला.
माझ्याकडे आपल्या पक्षाचे नाव नाही, चिन्ह नाही, ज्यांना दिले ते सोडून गेले आणि ज्यांना काही दिले नाही ते तुम्ही मला साथ देत आहात. उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आणि परवा जागतिक गद्दार दिन आहे. याच ठिकाणी कोव्हिड सेंटर होते आणि तेव्हा आपण आजारी लोकांसाठी काय काय केले ते सर्वजण मला सांगत आहेत. तुम्ही माझ्याबरोबर आहात तोवर कितीही शहा आणि औरंगजेब आले तरी मला पर्वा नाही. त्यांना सत्तेची मस्ती आहे. ही मस्ती दाखवायची तर मणीपूरमध्ये दाखवा. मोदी अमेरिकेत जाणार, पण मणीपूरला जात नाहीत. तिथे जाऊन विकत घेतलेल्या लोकांसमोर ज्ञान पाजळणार आहेत. त्याऐवजी त्यांनी मणीपूरला जाऊन तरी दाखवावे. आपल्या लोकांवर शाईफेक करतात, त्यांना मारहाण करतात. यापुढे असे झाले तर त्यांचे हात जागेवर ठेवू नका. आता मी पाटण्याला जात आहे. स्वातंत्र्याच्या रक्षणकर्त्यांची एकजूट होणार आहे. सावरकरांनी जे हाल सोसले ते शहा आणि मोेदींसाठी सोसले होते का?
देशाचे स्वातंत्र्य आणि देशाची लोकशाही कायम राखण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. हिटलरने आधी विरोधी पक्षांना संपवले. सत्य दडपून टाकू लागला. मी सांगतो तेच सत्य असे म्हणू लागला. दुर्दैवाने जनता निष्क्रिय राहिली आणि हिटलर माजला. आज तीच स्थिती आहे. शहा महाराष्ट्रात येऊन आम्हाला प्रश्न विचारतात. पण आम्ही अदानींबद्दल विचारले तर त्यांची बोबडी वळते. 370 कलम काढायला आम्ही पाठिंबा दिला होता, पण आता विचारतो की, काश्मीरमध्ये निवडणुका का घेत नाही?
कर्नाटकात मोदींचे नांव घेऊनही जिंकता आले नाही. कारण सर्वांचे डोळे उघडले आहेत. आम्ही उत्तमपणे सरकार चालवू शकतो. किंबहुना आम्ही सरकार चालवून दाखवले. मी सगळ्यांना झोपवले होते. मध्ये संकट आले, पण मी तुमच्या साथीने पुन्हा उभा राहिलो आहे. हे मुजरा करायला उठसूठ दिल्लीला जातात. आम्हाला हिंदुत्त्वाचे धडे देतात. एकदा संघाने त्यांचे हिंदुत्त्व काय आहे हे जाहीर करावे. वारकर्यांना मारतात हे हिंदुत्त्व आहे? मोहन भागवत मशिदीत जातात हे हिंदुत्त्व आहे? गोवंश हत्याबंदी देशभरात आणू शकत नाहीत हे हिंदुत्त्व आहे? समान नागरी कायद्याला आमचा पाठिंबा आहे, पण त्या कायद्याने हिंदूंचे किती हाल होणार हे आधी विचारा. तुमचं हिंदुत्त्व हे गोमूत्रात अडकले आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा प्रत्येकजण मग तो मुस्लीम असो, तो ख्रिश्चन असो, तो आमचा आहे, म्हणून तो हिंदू आहे. आईच्या कुशीवर वार करून तुमच्याकडे गेलेले आहेत त्या पापाचे फळ त्यांना भोगावा लागेल. नागरिकांची ओळख ‘हिंदुस्तानी’ म्हणून झाली पाहिजे, ‘मोदी भक्त’ म्हणून होऊ शकत नाही, मी होऊ देणार नाही.
निवडणुकीत हे पैसे ओततील. गद्दारांना 50 कोटी दिले, मग मतदारांना कितीही देतील. पैसा आणि योजनांचा पाऊस पडेल. पण कर्नाटकच्या जनतेने करून दाखवले. तुम्ही पदाधिकार्यांनी गावागावात विचारा की, सिलिंडर आले का, महागाई कमी झाली का, 15 हजार खिशात आले का, बेरोजगारी कमी झाली का? दहा वर्षांत जेवढी विल्हेवाट लावली त्यापेक्षा अधिक विल्हेवाट कुणी लावू शकतो का? हे विचारा, असा घणाघात त्यांनी भाजपावर केला आहे.