(मुंबई)
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय अस्थिरता माजली होती. या सत्ता संघर्षाला दररोज नवी कलाटणी मिळत होती. अखेर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आणि या सत्ता संघर्षाला पूर्णविराम दिला. यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. एकमेकांचे पेढे, मिठाई भरवून जल्लोष साजरा केला जात आहे. मुंबईतील ताज हॉटेलवर भाजपचे सर्व आमदार जमले असून आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती मिळत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नव्या सरकारचा १ जुलैला शपथविधी होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते १ जुलैला शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अडीच वर्षांत राज्याला न्याय द्यायचाय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे गटातील ४० आमदारांचे विशेष आभार व्यक्त केले. अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची एकनाथ शिंदे यांच्या गटाने हिंमत केली, त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. येत्या अडीच वर्षांत महाराष्ट्रातील प्रश्नांना न्याय द्यायचा आहे. पुढच्या सूचना येईपर्यंत आपण सर्वांनी मुंबईतच थांबावे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.