दापोली : शनिवारी ५ मार्च २०२२ रोजी बेलापूर, नवी मुंबई ते दापोली अशी २०० किमीची बीआरएम सायकल स्पर्धा अडॉक्स इंडिया रँडोनीअर (एआयआर), नवी मुंबई कल्याण सायकलिस्ट आणि फ्रान्समधील अडॉक्स क्लब पेरिसियन (एसीपी) या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे आयोजित केली आहे. २०० किमीचे अंतर १३ तास ३० मिनिटांमध्ये पूर्ण करायचं असल्यामुळे यामध्ये फक्त नेमकेच ठराविक कसलेले सायकलपटू भाग घेणार आहेत. यानिमित्ताने दापोलीमध्ये अनेक प्रसिद्ध, नॅशनल सायकलपटू येणार म्हणून दापोलीतील सायकलप्रेमी खुश आहेत.
बीआरएम हा रँडोनीअरिंगचाच एक प्रकार आहे. रँडोनीअरिंग म्हणजेच स्वबळावर केलेलं लांब पल्ल्याचं सायकलिंग. फ्रान्समधील अडॉक्स क्लब पेरिसियन (एसीपी) ही आंतरराष्टीय संस्था सायकल टुरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी बीआरएम सायकल स्पर्धेचे आयोजन करत असते. पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस (पीबीपी) हा १२०० किलोमीटरचा सायकल राईड इव्हेंट १८९१ साली पहिल्यांदा झाला. टूर-दी-फ्रान्स या स्पर्धेपेक्षाही जुना असा हा लोकप्रिय सायकल इव्हेंट. ‘पीबीपी’ चार वर्षांतून एकदा आयोजित केला जातो. जगभरातून यामध्ये सायकलस्वार सहभागी होत असल्यामुळे यातील सहभागींची संख्या मर्यादीत ठेवणे गरजेचे असते. म्हणूनच त्यासाठी काही पात्रता ठेवली जाते. ही पात्रता फेरी एक वर्ष आधीपासून सुरु होते. यामध्ये पात्र होण्यासाठी सायकलस्वाराने २००, ३००, ४०० आणि ६०० किलोमीटरची बीआरएम राइड ठराविक वेळेत पूर्ण केलेली असणं आवश्यक असते.
बीआरएमचे २००, ४०० किंवा ६०० किलोमीटरचं अंतर हे डोंगराएवढं असतं. बीआरएम मध्ये प्रत्येक अंतरासाठी वेळ ठरवून दिलेली आहे. २०० किमीचे अंतर १३ तास ३० मिनिटांमध्ये पूर्ण करायचं असते, ३०० किमीचे अंतर २० तासांत, ४०० किमीचे अंतर २७ तास ४० मिनिटे आणि ६०० किमीचे अंतर ४० तासांत पूर्ण करायचं असते. याचाच अर्थ अंतर वेळेत पूर्ण होण्यासाठी ताशी १५ किलोमीटर वेगाने सायकल चालवणं गरजेचे आहे. त्यामुळे ज्यांच्यामध्ये चिकाटी आहे असे कसलेले, सराव असलेले सायकलस्वार यामध्ये सहभागी होऊन ही राईड पूर्ण करतात.
बेलापूर ते दापोली या बीआरएम सायकल स्पर्धेचा मार्ग बेलापूर- पनवेल – पेण – नागोठणे – माणगाव – महाड – लाटवण – पालगड – दापोली असा आहे. यामध्ये काही महिला सायकलस्वार पण आहेत. सकाळी ५ वाजता बेलापूरहुन ही स्पर्धा सुरु होणार आहे आणि दुपारी २ नंतर हे सायकलस्वार दापोलीमध्ये पोहोचणार आहेत. या सर्वांचे दापोली सायकलिंग क्लब आणि सायकलप्रेमींतर्फे स्वागत केले जाणार आहे. जे सायकलस्वार साडे तेरा तासाच्या अगोदर दापोलीला पोहोचतील त्यांना अडॉक्स क्लब पेरिसियन (एसीपी) फ्रान्सतर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मेडल व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.