लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी जुन्या इमारतीतून संसदेचे नवीन इमारतीत स्थलांतर करण्याचे स्वागत केले आहे व नवीन इमारतीत उत्कृष्ट लोकशाही परंपरा जोपासल्या जातील, अशी आशा व्यक्त केली आहे. लोकशाही व्यवस्थेत ‘चर्चा करा, वाद घाला आणि निर्णय घ्या’ या तत्त्वावर अधिक लक्ष दिले पाहिजे. याचा अर्थ असा होत नाही की, आजकाल संसदेत चर्चा होत नाहीत. जुन्या इमारतीतील जागेच्या कमतरतेमुळे खासदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. त्यांना आधुनिक तांत्रिक सुविधा मिळण्यात अडचणी आल्या, त्यामुळे नवीन संसद भवन ही दीर्घकाळाची गरज आहे, असे सुमित्रा महाजन यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. संसदेची नवी इमारत ही जुने आणि नवे यांना जोडणारी दुवा ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
नवीन संसद भवनात आपल्या लोकशाहीच्या उत्कृष्ट परंपरा जपल्या जातील व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन आयाम जोडले जातील, अशी मला आशा आहे. याशिवाय, नवीन इमारतीत सभागृह शांततेत चालावे व सविस्तर चर्चा व्हावी, अशी माझी इच्छा आहे. माझ्या कारकिर्दीतही विरोधक गोंधळ घालायचे; पण त्यांनी कधी अपमान केला नाही.
असे सुमित्रा महाजन यांनी म्हटले.
त्या काळात सभागृहात चर्चा अधिक आणि गोंधळ कमी व्हायचा. सभागृह मोठ्या नेत्यांचे भाषण तल्लीन होऊन ऐकत असे. एखाद्या मोठ्या नेत्याला त्रास देणे, हे असभ्य मानले जात असे. एखाद्याची टर उडवणे किंवा त्यांच्या वक्तव्याला छेद देणे हे चांगले वर्तन मानले जात नव्हते. माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सभागृहात अनेकदा गोंधळाची स्थिती निर्माण झालेली मी पाहिली. पण मला एक कळले की, विरोधकांनी कधीही मला वैयक्तिक लक्ष्य केले नाही किंवा माझा अवमान होईल, असे कृत्य केले नाही. जेव्हा मी त्यांच्यावर रागवायचे, तेव्हा ते हसून म्हणायचे की, त्यांचा मला विरोध नाही. एकमेकांप्रति असलेला आदर मला पाहायला मिळाला. विरोधकही माझे मित्र बनले होते. तसेच नवीन सदस्यांनी मला ज्येष्ठत्वाचा मान दिला, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
Post Views: 3,347