(नागपूर)
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कालपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माजी मंत्री नवाब मलिक यांनी अजित पवार गटात जाऊन सत्ताधारी बाकावर बसले. विधानपरिषदेत तर यावरून वादळ उठले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच दमछाक झाली. त्यामुळे त्यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांना आपल्या पक्षात घेऊ नका, अशी विनंती केल्याने एकच खळबळ उडाली.
जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे अजित पवार गटात सहभागी होत सत्ताधारी बाकावर बसले. मलिक हे सत्ताधारी बाकांवर बसल्याने भाजपवरही टीका होऊ लागली, त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहित विरोध केला आहे.
सत्ता येते जाते, पण देश महत्वाचा. त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सामावून घेता कामा नये असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. विधानसभा सदस्य म्हणून सभागृहात येणे मलिक यांचा अधिकार आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो, असे फडणवीस यांनी पत्रात नमूद केले. परंतु, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे.
सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो. त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी आशा फडणवीस यांनी पत्रातून व्यक्त केली. तर या पत्राला उत्तर देतांना, आम्ही मलिक यांना पक्षातून सोडणार नाही, असे अजित पवार म्हणाले.
नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्यामुळे विधान परिषदेत शिवसेनेचा ठाकरे गट आणि काँग्रेसने राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाला धारेवर धरत अनेक प्रश्न उपस्थित केले.
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नवाब मलिक यांच्याबाबतची भूमिका ट्विटरवर (X) मांडली आहे. त्यांनी ट्विट करत आपलं म्हणणं मांडलं आहे. विशेष म्हणजे त्यांचं हे ट्विट अजित पवार यांनीदेखील रिट्विट केलं आहे.
“आमदार नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. आज विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे”,असं सुनील तटकरे म्हणाले आहेत.
आमदार श्री. @nawabmalikncp हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी…
— Sunil Tatkare (@SunilTatkare) December 7, 2023