(मुंबई)
मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यातंर्गत (पीएमएलए) अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक खरेच आजारी आहेत का, असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने याचा खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. नवाब मलिक यांनी जामिनासाठी याचिका केली आहे. या याचिकेवर न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. नवाब मलिक यांनी उपचाराचे कारण देत जामीन मागितला आहे, मात्र ते खरेच आजारी आहेत का? हे आधी पटवून द्या, तरच त्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी होईल. अन्यथा जामिनासाठी इतरही बऱ्याच याचिका प्रलंबित आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
पीएमएलए कलम ४५ अंतर्गत जामीन मंजूर करण्याची तरतूद आहे. त्यासाठी काही अटी आहेत. एक तर अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद केली गेली असेल. दुसरे म्हणजे आरोपीचे वय १६ वर्षांपेक्षा कमी असेल, आरोपी महिला आहे किंवा आरोपी आजारी आहे. या कारणांसाठी जामीन दिला जातो. त्यामुळे जामिनासाठी याचिका करणाऱ्या प्रत्येक आरोपीला तो आजारी असल्याचे सिद्ध करण्यास सांगितले जाते. त्यामुळे नवाब मलिक हे खरचं आजारी आहेत हे स्पष्ट व्हायला हवे, असे न्यायालयाने नमूद केले. याचा खुलासा करण्यासाठी वेळ देत न्यायालयाने ही सुनावणी २१ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.