(सातारा)
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील विंग या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नवविवाहितेने स्वयंपाक घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना त्या विवाहितेच्या सासूला समजताच तिनेदेखील हाताच्या नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच नवविवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन सासरच्या घरासमोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे ता ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नीलम अनिकेत माने (वय 21) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
बीड येथील नीलमचा तीन महिन्यांपूर्वी विंग येथील अनिकेत मानेशी विवाह झाला होता. शनिवारी रात्री नीलम स्वयंपाकगृहात झोपली होती. तर पती अनिकेत, सासू राणी माने व सासरा अंकुश माने हे तिघे जण बाहेरच्या खोलीत झोपले होते. रविवारी सकाळी सातच्या सुमारास नीलम दरवाजा उघडत नसल्याने कुटुंबियांनी दरवाजा तोडून स्वयंपाकगृहात प्रवेश केला. त्यावेळी नीलमने पत्र्याच्या अँगलला ओढणीच्या मदतीने गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. याचा धक्का बसल्याने नीलमची सासू राणी माने यांनी दोन्ही हातांच्या नसा कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच कराड तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या घटनेची माहिती मिळताच मृत नीलमचे माहेरचे अनेक नातेवाईक कराडला दाखल झाले. त्यांनी कराड तालुका पोलीस ठाणे व उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यानंतर नीलमच्या मृतदेहावर तिच्या सासरच्या दारात अंत्यसंस्कार करण्याची मागणी नातेवाइकांनी केली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहेत.