(मुंबई)
मुंबईतील सुमन नगर परिसरात असलेल्या अण्णाभाऊ साठे ब्रिजखाली पेटलेल्या अवस्थेत एक महिला जिवाच्या आकांताने मदतीची याचना करताना पाहूनही कोणी पुढे येत नव्हते. रस्त्याने जाणा-येणाऱ्या अनेक पादचारी आणि वाहनांतील नागरिकांनी तिच्याकडे पाहिले आणि नकारार्थी माना हालवत पुढे निघून गेले. दरम्यान, ऑटोचालक असलेल्या मोहम्मद इस्माईल शेख याच्यातील मानवता जागी झाली. त्याने महिलेच्या अंगावर रिक्षातील बॉटलने पाणी ओतले आणि तिला रिक्षात घेऊन हॉस्पिटल गाठले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला तीला त्वरित मदत मिळाल्याने केवळ 10% भाजली असून, वेळीचउपचार दिल्याने तिची प्रकृती स्थिर आहे.
मोहम्मद इस्माईल शेख हा ऑटोरिक्षा चालक आहे. दररोज असंख्य प्रवाशांना भाड्याने रिक्षा उपलब्ध करुन द्यायची आणि उदरनिर्वाह करायचा अशी त्याची दिनचर्या. दरम्यान, मोहम्मद इस्माईल शेख याने ब्रिजखाली एक महिला जिवंत जळताना पाहिली. महिला मदतीची याचना करत असतानाच इस्माईल धावला. त्याने बॉटलने पाणी मारुन महिलेच्या कपड्याला लागलेली आग विझवली. त्यानंतर तिला घेऊन थेट सायन रुग्णालय गाठले. ज्यामुळे महिलेला उपचार मिळाले. मोहम्मद इस्माईल शेख या रिक्षाचालकाच्या रुपात या महिलेसाठी चक्क देवदूत आल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.
सरिता ठाकूर (वय ३२ वर्षे) असे या महिलेचे नाव आहे. सविता कुर्ला परिसरात असलेल्या अण्णाभाऊ साठे पूलाखाली रोजच्या प्रमाणे कामावर जाण्यासाठी बसची वाट पाहत उभी होती. यावेळी तिचा पती तिच्याजवळ आला आणि त्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून लाईटरच्या सहाय्याने तिला पेटवलं आणि तिथून पळ काढला. यात महिलेच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. ज्यामुळे महिला घाबरली, अत्यवस्थ झाली. आगीच्या चटक्यांनी वेदना होऊ लागल्याने महिलेने आरडाओरडा करत मदतीची याचना सुरु केली. दरम्यान, उपस्थीतांपैकी कोणीही मदतीला धावले नाही. अखेर मोहम्मद इस्माईल शेख याने इतर कोणताही विचार न करता महिलेला मदत करत हॉस्पीटलमध्ये दाखल केले.
संजय राठोड असे आरोपी पतीचे नाव आहे. घरगुती वादामुळे गेल्या काही दिवसांपासून सरिता पतीपासून विभक्त चेंबूरच्या सुमन नगर भागात माहेरी राहत होती. त्यामुळे संजय राठोड याने तिला ठार मारण्यासाठी तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु मोहम्मद इस्माईल शेख या रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानामुळे सरिता यांचा जीव वाचला आहे.