रत्नागिरी :- यावर्षी ७ ते १५ ऑक्टोबर २०२१ दरम्यान नवरात्र/दुर्गापुजा/दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. नवरात्रौत्सव साजरा करताना सर्व नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. त्याअनुषंगाने शासनाकडून खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहेत.:-
१) कोवीड-१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक क्र. DMU / २०२० /CR.९२/DisM-१, दि.४/६/२०२१, सार्वजनिक आरोग्य विभाग आदेश क्र. No.Corona २०२१/C.R.३६६/Arogya-५, दि.११/८/२०२१ तसेच आदेश क्र. No. Corona २०२१/C.R.३६६/Arogya-५, दि. २४/९/२०२१ अन्वये “ब्रेक द चेन” अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे.
२) सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.
३) कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.
४) यावर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी.
५) देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरीता ४ फूट व घरगुती देवीच्या मुर्तीची उंची २ फूटांच्या मर्यादेत असावी.
६) मागील वर्षी प्रमाणे शक्यतो देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती
शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.
७) नवरात्रौत्सवाकरीता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्विकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी तसेच ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.
८) गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रमे/शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
९) देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याची जास्तीत जास्त व्यवस्था करावी.
१०) देवीच्या मंडपामध्ये प्रत्यक्ष येवून दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २४ सप्टेंबर २०२१ च्या ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
११) आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे.
१२) मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई असेल.
१३) देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येवू नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले व वरिष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येवू नये.
१४) महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. तसेच नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्विकृती केंद्राची व्यवस्था करावी
१५) विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्रात असेल तर मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.
१६) दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून साजरा करावा. रावण दहनाकरीता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत. त्यांना फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी.
१७) कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत स्थानिक प्रशासनाकडून अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.