(संगलट-खेड /इक्बाल जमादार )
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय पंच परीक्षा नुकतीच रत्नागिरी जिल्हा कबड्डी असो. मार्गदर्शनानुसार खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवभारत हायस्कूल भरणे येथे संपन्न झाली. या स्पर्धेसाठी राज्य असोसिएशनच्या वतीने नियुक्त राज्यपर्यवेक्षक श्री.भरत मुळे राष्ट्रीय पंच व सह सेक्रेटरी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांची तर खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे सचिव श्री. रविंद्र बैकर यांची केंद्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या परीक्षा केंद्रावर चिपळूण १२, गुहागर ०२, व खेड १५ अशा एकूण २९ पात्र जिल्हा पंचानी परीक्षा दिली.
दिनांक 25 सप्टेंबर रोजी खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा देऊन परीक्षेची सुरुवात झाली यानंतर लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा नियोजन प्रमाणे पार पडली.
समारोपप्रसंगी खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री.सतीश उर्फ पप्पूशेठ चिकणे, चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे मुख्य कार्यवाह श्री.विलास गुजर, राष्ट्रीय कोच श्री.संतोष शिर्के यांचेसह खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष श्री.दाजी राजगुरू, सहसचिव श्री.शरद भोसले, कार्यकारणी सल्लागार, ज्येष्ठ पंच श्री.दिलीप कारेकर, श्री. सुभाष आंबेडे, प्रो कबड्डी पंच श्री.आशुतोष साळुंखे, श्री.विलास बेंद्रे, राष्ट्रीय पंच श्री.राजेंद्र चांदिवडे, श्री संतोष शिर्के, श्री.पांडुरंग विठमल यांचे सह अन्य मान्यवर व सर्व परिक्षार्थी उपस्थित होते.
कबड्डी खेळाकडे पाहण्याचा आपला सकारात्मक दृष्टिकोन व योगदान आपल्याला सर्वोच्च स्थानी पोहोचवत असते. त्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत राज्य पर्यवेक्षक श्री.भरत मुळे यांनी व्यक्त करून सर्व परीक्षार्थी पंचांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्री.विलास गुजर यांनी आपले अनुभव कथन केले. खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या वाटचालीत यापुढे आपले योगदान द्यावे व वेळोवेळी असोसिएशनच्या वतीने होणाऱ्या सर्व स्पर्धा व शिबिरात आपण सक्रिय सहभागी होऊन कबड्डीचा उत्कर्षासाठी सहकार्य करावे असे आवाहन नुतन पंचांना खेड तालुका कबड्डी असो. अध्यक्ष श्री.पप्पुशेठ चिकणे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव श्री.शरद भोसले यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय पंच श्री.सुभाष आंबेडकर यांनी मानले.