(संगमेश्वर / प्रतिनिधी )
नवभारत छात्रालया आपण शिकलो आणि आपण येथील विद्यार्थी आहोत . येथे केवळ शिक्षण दिले जात नाही तर , संस्कार केले जातात . या संस्कारांच्या जोरावर हजारो विद्यार्थी येथे घडले . डोक्यावर लोखंडी ट्रंक घेऊन आपण या नवभारत छात्रालयात आलो होतो . वन विभागाच्या कार्यालयाजवळील ओढ्यालगत आपल्याला ठेच लागली आणि ट्रंक डोक्यावरुन खाली पडली . छात्रालयात प्रवेश करण्यापूर्वी पायाला लागलेली ठेच खूप काही शिकवून गेली . या छात्रालयातील संस्कारांनी आपल्याला केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहचवले . येथील संस्कारांमुळे नवभारत छात्रालयाचा विद्यार्थी असल्याचा आपल्याला नेहमीच अभिमान वाटत आला असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी दापोली येथे नवभारत छात्रालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना केले .
यावेळी अध्यक्षीय भाषणात अनंत गीते पुढे म्हणाले की , नवभारत छात्रालयाला आज ७५ वर्षे पूर्ण होवून गेली आहेत . गतवर्षी या छात्रालयाने अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले . या ७५ वर्षांच्या कालावधी मध्ये संस्थेने अनेक कुटुंबे उभी केली आहेत . आमचे गीते कुटुंब त्यापैकीच एक आहे . या छात्रालयाचे असंख्य उपकार आमच्या गीते कुटुंबीयांवर आहेत . मी या गीते कुटुंबाचा एक सदस्य आहे याचा मला अभिमान आहे . आर्थिक नियोजनात शिक्षणासाठी फारच कमी तरतूद केली जाते . त्यामुळे आज उपलब्ध असलेली शिक्षण पध्दती स्विकारुन आपली प्रगती करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे असे गीते यांनी अखेरीस नमूद केले .
कार्यक्रमाची सुरुवात गुरुद्वयांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करुन व मान्यवरांनी वंदन करुन झाली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थाध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी संस्था राबवित असलेल्या विविध उपक्रमांची आणि संस्थेच्या नियोजित उपक्रमांची माहिती थोडक्यात विषद केली . छात्रालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भरारी अंकाचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आले . छात्रालयाचे माजी छात्र आणि माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते यांनी दोन्ही गुरुंच्या आठवणींना उजाळा दिला . यावेळी सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृती पुरस्काराचे वितरण रोख पाच हजार रुपये , स्मृती चिन्ह , मानपत्र , शाल श्रीफळ देवून अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आले . यामध्ये प्राथमिक – माध्यमिक शिक्षक , उत्कृष्ट शेतकरी , कृषी विस्तार कार्यकर्ता, यशस्वी कृषी उद्योजिका या सात जणांचा समावेश होता .
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महेंद्र कदम यांचे वर्तमान शिक्षण व्यवस्था आणि भविष्य या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले . शिक्षण क्षेत्रातील विविध आयामांचा त्यांनी आढावा घेतला. उच्च शिक्षण समाजातील खालच्या स्तरापर्यंत नेण्यासाठी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी खासगी शिक्षण संस्था वाढीसाठी प्रोत्साहन दिले . त्यामुळे ग्रामिण भागासाठी महाविद्यालयीन शिक्षण , तंत्रशिक्षण , वैद्यकीय शिक्षण उपलब्ध झाले असे कदम यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे नियोजन संस्थाध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले . सरचिटणीस हरिश्चंद्र कोकमकर , उपाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत , सहसचिव राजेंद्र शिंदे , रविंद्र गायकर , सुषमा शिंदे , सौ . गार्गी सावंत आदिंची साथ मिळाली . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्था कर्मचारी रवींद्र गोरीवले , प्रशांत मांडवकर , सुजीत गोलामडे , वर्षा गोरीवले , रेणूका शिंदे , समीर शिबे , मिलींद पाथे , संजय पड्याळ , किर्ती घाग , रामचंद्र दवंडे , कमलाकर मुळे , प्रियांका साखरकर , समीधा कोकमकर , जिविका शिगवण , अक्षता गोरिवले , विद्या पड्याळ यांनी विशेष परीश्रम घेतले . कार्यक्रमाप्रसंगी प्रार्थना आणि वंदेमातरम् कन्या छात्रालयाच्या विद्यार्थींनींनी सादर केले . कार्यक्रमाचे उत्तम आणि नेटके सुत्रसंचालन प्रभाकर तेरेकर यांनी तर आभार प्रदर्शन लहू केसरकर यांनी केले .