(मुंबई)
बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग रामसिंग कुंडलेस यांना शुक्रवारी सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला. कुंडलेस यांना फरार घोषित करण्यासंबंधी शिवडीच्या महानगर दंडाधिकाऱ्यांचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश संतोष कुलकर्णी यांनी कायम ठेवला. याचवेळी दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार देत कुंडलेस यांची याचिका धुडकावून लावली.
शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने गेल्या महिन्यात हरभजन कुंडलेस यांना फरार घोषित केले. त्याच वेळी कुंडलेस व नवनीत राणा या दोघांनाही न्यायालयात हजर राहण्यासाठी महिनाभराची मुदत दिली होती. त्या आदेशाविरोधात कुंडलेस यांनी अॅड. गजेंद्र जाधव यांच्या मार्फत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश संतोष कुलकर्णी यांच्यापुढे सुनावणी झाली.
नवनीत राणा यांच्या अर्जावर २ मार्चला फैसला
नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत दंडाधिकारी न्यायालयातील कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. त्यांची ही मागणी म्हणजे अटक टाळण्यासाठी केलेली चालढकल आहे, असा दावा तक्रारदार वंजारी यांचे वकील सचिन थोरात यांनी केला. त्याची दखल घेत अतिरिक्त महानगर दंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी निर्णय २ मार्चला देणार असल्याचे जाहीर केले.
नेमके प्रकरण काय?
नवनीत राणा यांनी २०१९मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अनुसूचित जातीचे बोगस प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नवनीत व त्यांच्या वडिलांविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून शिवडी महानगर दंडाधिकाऱ्यांनी चौथ्यांदा अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. त्यामुळे दोघांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. वारंवार तंबी देऊनही न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे दोघांच्या अडचणीत वाढ झाली आहे.