(रत्नागिरी)
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व रत्नागिरी नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आता नळपाणी योजनेचे तांत्रिक व आर्थिक लेखापरीक्षण अहवाल येईपर्यंत भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. मात्र, अहवाल आल्यानंतर तो समाधानकारक नसल्यास आंदोलनावर ठाम असल्याचे राजेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रत्नागिरीची नवीन नळपाणी योजना अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यरत झालेली नाही. ५४ कोटी रुपये निधी सुरुवातीच्या काळात उपलब्ध झाले. मात्र, वाढीव निधी आणि वाढीव वेळ प्राप्त झाल्यानंतरदेखील काम पूर्णत्वास गेले नाही. यास अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता जबाबदार आहे की उदासीनता? असा सवाल भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना विचारला होता. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत योजनेचे तांत्रिक व आर्थिक लेखापरीक्षण करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र असे न झाल्यास भारतीय जनता पक्ष तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा दिला होता. पालिका मुख्याधिकाऱ्यांसह जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सावंत यांना लेखी उत्तर देत आंदोलन न करण्याची विनंती केली होती. त्यानंतर सावंत यांनी आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे.
मुख्याधिकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जीवन प्राधिकरणाच्या पर्यवेक्षणाखाली योजनेचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. संपूर्ण शहराला ११० मिमी व्यासाची १ लाख २० हजार २७८ मीटर लांब जलवाहिनी टाकण्यात आली आहे.
रत्नागिरी शहर पाणीपुरवठा योजनेकरिता वापरलेल्या पाईप्सची गुणवत्ता तपासणी एसजीएस सारख्या मान्यताप्राप्त त्रयस्थ संस्थेकडून करण्यात आली आहे. तसेच, झालेल्या कामाचे वेळोवेळी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय या त्रयस्थ यंत्रणेकडून तांत्रिक लेखापरीक्षण केले जात आहे. या योजनेचे काम १०० टक्के पूर्ण झाल्यानंतर तसेच, कामाचा दोष निवारण दायित्व कालावधी संपुष्टात आल्यानंतरच ठेकेदाराला कार्यालयाकडे जमा असलेल्या सुरक्षा अनामत रकमेचा परतावा करण्यात येणार असल्याचे पालिकेने दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे.
जलवाहिनीवर एअरव्हाल्व्ह बसवणार
शहराच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता नैसर्गिक उतार असल्याने जलवाहिन्यांवर अनेक ठिकाणी एअरव्हाल्व्ह टाकणे आवश्यक होते. जलवाहिनीवर आवश्यक त्या ठिकाणी एअरव्हाल्व्ह बसविण्याच्या ठेकेदारास सूचना देण्यात आल्या असून, येत्या काही दिवसांत जलवाहिनीवर एअरव्हाल्व्ह बसविण्याचे काम पूर्ण हाईल. परिणामी, एअरव्हाल्व्हच्या अभावी वारंवार जलवाहिनी फुटण्याच्या घटना टळू शकतील.