उत्तराखंडमध्ये केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘नमामि गंगे’ प्रकल्पाचे काम सुरू असताना बुधवारी एक मोठा अपघात घडला. चमोली जिल्ह्यात अलकनंदा नदीच्या काठावर या प्रकल्पाचे काम सुरू असताना ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन विजेचा प्रवाह लोखंडी रेलिंगमध्ये प्रवाहित झाला आणि शॉक लागून 22 कर्मचारी होरपळले. त्यापैकी 15 जणांचा मृत्यू झाला तर अन्य जखमी आहेत. मृतांमध्ये सहा पोलीस कर्मचार्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
बुधवारी सकाळी 22 कर्मचारी येथे काम करत होते. लोखंडी रेलिंगच्या पुलावर हे कर्मचारी होते आणि अचानक ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. स्फोट होताच क्षणार्धात विजेचा प्रवाह रेलिंगमध्ये कार्यान्वित झाला. काही कळण्याच्या आतच या सर्व कर्मचार्यांना विजेचा धक्का बसला. 15 जणांचा मृत्यू झाला तर 7 जखमी झाले असून त्यातील 2 गंभीर जखमी आहेत. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस व बचावपथकाने घटनास्थळी पोहचून मदतकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेबाबत माहिती देताना उत्तराखंडचे अतिरिक्त पोलिस महासंचालक व्ही. मुरुगेसन यांनी सांगितले की, या दुर्घटनेत एक पोलीस उपनिरीक्षक आणि पाच होमगार्डसह सुमारे 15 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, रेलिंगमध्ये करंट होता. तपासात अधिक तपशील समोर येईल. शिवाय चमोलीच्या ऊर्जा महामंडळाचे कार्यकारी अभियंता अमित सक्सेना यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री तिसर्या टप्प्यातील वीज खंडित झाली होती. बुधवारी सकाळी तिसरा टप्पा जोडण्यात आला, त्यानंतर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या आवारात विद्युत प्रवाह उतरला. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या. त्यांनी चमोली जिल्हाधिकार्यांकडून घटनेची माहिती घेतली. जखमींना डेहराडूनला आणले असल्याचे त्यांनी सांगितले. जखमींच्या उपचारात कोणतीही कमतरता राहता कामा नये, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत