(रत्नागिरी/प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत पर्जन्यमान तसेच पाणी पातळी याची सूचना देण्यासाठी चॅटबोट हे प्रणाली नागरिकांसाठी लागू केली आहे. या प्रणालीद्वारे घरबसल्या नागरिकांना आपत्कालीन स्थितीची माहिती मिळणार आहे. गेल्या पाच दिवसात या चॅटबोट प्रणालीचा तब्बल सव्वा लाखाहून अधिक नागरिकांनी वापर केला तसेच जिल्ह्याबाहेर अन्य राज्यांसह परदेशातील रत्नागिरीवासीयांनीही याचा वापर केला.
रत्नागिरी जिल्ह्यातून प्रवास करताना पर्यटक तसेच स्थानिक लोकांना जिल्ह्यातील पर्जन्यमान, नद्यांची पातळी, भरती – ओहोटी वेळापत्रक, महत्त्वाचे संदेश, रस्ते वाहतूक, रस्त्यावर दरड कोसळली असल्यास पर्यायी मार्ग आदीबाबत या प्रणालीवरून माहिती मोबाईलवर उपलब्ध होत आहे.
या प्रणालीचा प्रारंभ झाल्यापासून 24 तासात 22 हजार जणांनी माहिती घेण्यासाठी वापर केला. या प्रणालीची 18 हजार जणांना माहिती घेता येईल अशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र प्रमाणापेक्षा जास्त लोकांनी याचा वापर केल्यामुळे ही यंत्रणा कोलमडली. त्यानंतर या प्रणालीची क्षमता वाढविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांच्या संकल्पनेतून ही योजना करण्यात आली होती.