(नवी दिल्ली)
नथुराम गोडसेच्या गोळीने महात्मा गांधींची हत्या झालीच नाही, असा खळबळजनक दावा रणजित सावरकरांनी केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतु रणजित सावरकर यांच्या “मेक शुअर गांधी इज डेड” या पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीतील महाराष्ट्र सदनात झाले. या पुस्तकात रणजित सावरकर यांनी हा दावा केला आहे. या पुस्तकात आणखीही अनेक खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या पुर्वसंध्येला हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले असुन यामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.
७६ वर्षांपूर्वी महात्मा गांधींची हत्या झाली आणि या घटनेमुळे जगाचे राजकारण बदलले. मात्र या संदर्भात गेली सात वर्षे संशोधन करून मी हे पुस्तक लिहिले. यासाठी महात्मा गांधींच्या हत्येच्या कटाच्या चौकशीसंदर्भात नेमलेल्या कपूर आयोगाचा अभ्यास केला. या आयोगाचा अहवाल काँग्रेसने स्वीकारला नव्हता. तत्कालीन घटनेचा फॉरेन्सिक अहवाल ज्या गोळीवर आधारित आहे त्याचा फोटो आणि विश्लेषण देखील पुस्तकात जोडले आहे, असेही रणजित सावरकर यांनी सांगितले.
नथुराम गोडसे महात्मा गांधींना मारायला आला होता हे खरे आहे. मात्र त्याच्या पिस्तुलातून मारलेल्या गोळ्यांनी महात्मा गांधींची हत्या झाली नाही हेही तेवढेच खरे आहे, असाही दावा त्यांनी केला. तसेच या प्रकरणात नथुराम गोडसेची उलटतपासणीही झाली नव्हती. गोडसेने झाडलेली गोळी आणि ज्या गोळीने महात्मा गांधींचा मृत्यू झाला ती गोळी यांच्या आकारात फरक आहे. त्यामुळे तिसऱ्याच व्यक्तीच्या गोळीने महात्मा गांधींचा मृत्यू झाला, असा दावाही पुस्तकात करण्यात आला आहे.
“मेक शुअर गांधी इज डेड” हे पुस्तक प्रकाशित होऊ नये, यासाठी माझ्यावर दबाव आणला गेला. अनेक प्रकाशकांनी शेवटच्या क्षणी प्रकाशनाला नकार दिला. त्यामुळे मी हे पुस्तक स्वतः प्रकाशित केल्याचेही रणजित सावरकर म्हणाले. तसेच महात्मा गांधींच्या हत्येचा तपास पुन्हा नीट झाला पाहिजे ही मागणी लोकांनी करावी, मात्र मी केंद्राकडे तपासाची मागणी करणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले.
रणजीत सावरकरांचा काय आहे दावा
- 2 फुटांवरून अशा गोळ्या मारणे शक्य नाही, मारलेल्या गोळीचा अँगल देखील वेगळा होता.
- महात्मा गांधींना लागलेल्या गोळ्या वेगळ्या दिशेने आल्या होत्या
- फॉरेन्सिकचा अहवाल ज्या गोळीबार आधारित आहे, त्याचा फोटो जोडला आहे.
- पोलिसांनी पंचनामे खोटे बनवले आहेत. हे सगळं मी माझ्या पुस्तकात लिहिलं आहे. पोलिसांनी तपास नीट केला नाही.
- नथुराम गोडसे हे गांधी यांना मारायला आले होते हे 100 टक्के खरं, त्यांनी गोळ्या मारल्या हेही 100 टक्के खरं. पण नथुराम गोडसे याच्या पिस्तुलातून मारलेल्या गोळीतून गांधींचा खून झाला नाही. नंतर या प्रकरणाचा तपास नीट झाला नाही.
- गांधी हत्येचा फायदा नेहरू घराण्याला झाला.
- हत्येबाबत हे प्रश्न लोकांनी उपस्थित केले पाहिजे. मी केंद्राकडे तपासाची मागणी करणार नाही, ही मागणी लोकांनी करावी.
- गांधी हत्येनंतर 20 वर्षांनी जसा कपूर कमीशन नेमला तसा दुसरा कमीशन नेमून दडपलेले पुरावे बाहेर काढावेत.
- मी कुठलाही स्पेकुलेशन करत नाही, मी हे फॉरेन्सिक तपासातून मांडत आहे.
- महात्मा गांधींची हत्या प्रकरणातील पंचनामे खोटे बनवले आहेत