( चिपळूण / प्रतिनिधी )
पैशांसाठी चक्क एका बँकेत सोन्याचे खोटे दागिने तारण ठेवण्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. ओळखीचा फायदा घेत एका महिलेमार्फत ते खोटे दागिने बँकेत ठेवण्यासाठी देणाऱ्या बंगाली व्यावसायिकाचा हा कारनामा समोर आल्यानंतर त्यास नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, या बाबात येथील पोलिसात कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही.
एक महिला सोन्याचे दागिने घेऊन शहरातील चिंचनाका परिसरातील एका बँकेत गेल्यानंतर ते दागिने तारण ठेवायचे असल्याचे बँकेतील अधिकाऱ्यांना सांगितले. ते दागिने बँकेच्या सोनाराने पाहिले असता खोटे असल्याचा संशय आला. त्यानंतर त्या महिलेकडे हे दागिने कुणाचे आहेत, कुठून आणले, खोटे दागिने बँकेत ठेवण्यासाठी कशाला आणले, असे प्रश्न सोनाराने त्या महिलेला विचारले. मात्र त्या खोट्या दागिन्याबद्दल त्या महिलेला कोणतीच कल्पना नव्हती. बँकेत खाते असल्याने ते दागिने तिच्या ओळखीतील एका बंगाली सोनाराने बँकेत ठेवण्यासाठी दिल्याची माहिती तिने दिली. त्यानुसार त्या बंगाली व्यावसायिकाला तेथे बोलावण्यात आले व संतप्त नागरिकांनी बेदम चोप दिला. या बाबत अद्यापही पोलीस स्थानकात तक्रार दाखल झालेली नाही…