(मुंबई)
बारामती अॅग्रो प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांची गुरुवारी ईडी चौकशी पूर्ण झाली आहे. रोहित पवार यांची जवळपास नऊ तास चौकशी झाली. दुपारी 12 वाजताच्या सुमारास ते बॅलॉर्ड पीअर येथील ईडी कार्यालयात दाखल झाले होते. याआधी ईडीकडून रोहित पवारांची 24 जानेवारीला तब्बल 11 तास चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांना काल (गुरुवारी) पुन्हा चौकशीसाठी बोलावले होते.
रात्री 9.15 च्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. बारामती अॅग्रो प्रकरणात रोहित पवारांची ही चौकशी करण्यात आली. रोहित पवारांच्या या चौकशीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकार विरोधात राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि तहसील कार्यालय या ठिकाणी घंटानाद करण्यात आला.
रोहित पवार म्हणाले, मी ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केलं. ईडीच्या अधिकाऱ्यांना यापुढे सुद्धा सहकार्य करणार आहे. 8 फेब्रुवारी रोजी आणखी कागदपत्रे सादर करणार आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात मी गेलो होते. 24 जानेवारी रोजी जी कागदपत्रे, माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांकडून माझ्याकडे मागण्यात आली होती. ही सर्व कागदपत्रे घेऊन मी ईडी कार्यालयात पोहोचलो होतो. ही कागदपत्रे सादर केल्यावर त्यांनी मला बरेच प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरे मी त्यांना दिली. काही नवीन प्रश्न विचारण्यात आले.
“देशात आणि महाराष्ट्रात लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे, तपास यंत्रणांच्या माध्यमातून जो काही प्रयत्न होतोय त्याला विरोध करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते उपोषण करत आहेत. त्यांना मी विनंती करतो की, त्यांनी उपोषण मागे घ्यावं”, असं रोहित पवार आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.
NCP-Sharad Pawar faction leader Rohit Pawar says "Officers told me to come again on 8th February and submit the remaining documents. I support the investigating officer and submitted documents today and everyone supported me…" pic.twitter.com/vZUhT7oDgC
— ANI (@ANI) February 1, 2024
पुढे ते म्हणाले, “मी ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर काही लोकांनी सांगितलं की, राज्याच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या पदाधिकारी, नागरीक, कार्यकर्त्यांनी लोकशाहीचा आवाज ज्या पद्धतीने दाबला जातोय, तसंच सामान्य माणसांच्या मुद्द्यावर चर्चा केली जात नाही, त्यामुळे सामान्य लोकांच्या वतीने लढत असताना आपल्यावर कारवाई होत असेल, तर ते जिल्ह्यांमध्ये सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन लढले, कलेक्टर, तहसीलदारांना भेटले, त्यांनी आंदोलन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जनतेचा आवाज त्यांनी शासनापर्यंत पोहोचवला”, असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार म्हणाले, मी एकच सांगतो की आपण कुठेही चूक केलेली नाहीये. सध्या जी चौकशी सुरू आहे ती पाहता असंच म्हणावं लागेल की, मुंबई शहरात कुठंतरी सोन्याचा हंडा लपवलाय असं काही लोकांनी सांगितलं. त्यामुळे काही विचारायचं आहे ते विचारा, जे शोधायचं आहे ते शोधा पण हा कथित लपलेला हंडा शोधण्याचं काम काहींकडून केलं जात आहे. आपल्या सर्वांना सांगतो की, व्यवसायात मी आधी आलो आणि नंतर राजकारणात आलो त्यामुळे आम्ही विचारासाठी लढत आहोत. राज्य सरकारमधील नेत्यांना वाटत असेल की आम्ही घाबरलो.. त्यांना एकच सांगतो खरी मराठी माणसं कधी घाबरत नाहीत.