(रत्नागिरी)
७ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या पहिल्यावहिल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनकरिता रत्नागिरी हॉटेल असोसिएशनने पुढाकार घेत बहुमोल सहकार्य केले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने बाहेरगावाहून हजारो धावपटू, सहकारी रत्नागिरीत दाखल होणार आहेत. हे सर्व धावपटू हॉटेल्समध्ये राहणार आहेत. यानिमित्ताने पर्यटनाचा विकासही होणार आहे. यामुळे सर्वच हॉटेल्स चालकांनी एकत्र येत या स्पर्धेचे फलक दर्शनी भागात प्रदर्शित केले आहेत. नववर्ष स्वागताला येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिकांनाही या स्पर्धेची माहिती मिळून नोंदणी वाढत आहे.
सुवर्णसूर्य फाउंडेशन आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित व महाराष्ट्र पर्यटन संचालनालय, बॅंक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होणार आहे. हॉटेल असोसिएशनसोबत बैठक घेण्यात आले. त्यानुसार सर्व हॉटेल्मालक सर्व धावपटूंचे स्वागत जोरदार कारणार आहेत. रिफ्रेशमेंटची जबाबदारी मोठ्या आनंदाने स्वीकारली आहे. हॉटेल असोसिएशनने न्यूट्रिशन सपोर्ट देण्याचे ठरवले आहे. तसेच रूम बुकिंगवर काही स्पेशल डिस्काउंटसुद्धा दिला आहे. त्यामुळे आतापर्यंत बहुतांशी हॉटेल्समधील खोल्या आरक्षित झाल्या आहेत. स्पोर्ट्स टुरिझम हा अनोखा प्रकार रत्नागिरीमध्ये होतोय. त्या करता सगळी हॉटेल्स सज्ज झाली आहेत. ही स्पर्धा दरवर्षी होणार असल्याने पर्यटनवाढीसाठी उपयोग होणार आहे.
या स्पर्धेसाठी आतापर्यंत ८५० हून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. लवकरच एक हजारचा टप्पा पार होईल. स्पर्धेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सांगली, कोल्हापूर, सातारा, बारामती यासह परराज्यातीलही धावपटूंनी नोंदणी केली आहे.
थिबा पॅलेस येथून स्पर्धेला प्रारंभ होईल. ५, १० आणि २१ किमीची हाफ मॅरेथॉन होणार आहे. २१ किलोमीटरसाठी थिबा पॅलेस, मारुती मंदिर, काजरघाटी, सोमेश्वर, कोळंबे, फणसोप, भाट्ये अशा ९ गावांतून निसर्गरम्य वातावरणातला रस्ता निवडण्यात आला आहे. आता थंडीचाही जोर वाढला आहे. त्यामुळे ७ जानेवारीलाही चांगलीच थंडी असेल व या मार्गावरून धावताना एका बाजूला खाडीचा परिसर, डोंगर, दऱ्या, झाडी आणि सूर्योदय होताना पाहायला मिळणार आहे. दर रविवारी थिबा पॅलेस येथे प्रॅक्टिस रनही आयोजित केली आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार असून 5 किमी, 10 किमी आणि 21 किमीसाठी स्पर्धा आहे. यामध्ये महिला, पुरुष यांचे वयोगटानुसार गट करण्यात आले आहे. यामध्ये आकर्षक बक्षिसे, चषक देऊन विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन धावनगरी रत्नागिरी करूया, असे आवाहन सुवर्णसूर्य फाउंडेशन आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने केले आहे.
फोटो:
धावनगरी रत्नागिरीसाठी कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करताना हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर. डावीकडून सुहास ठाकुरदेसाई, रुपेश देवस्थळी, शुभम संसारे, अप्पा देसाई, श्री. म्हापुस्कर, श्री. वायंगणकर, महेश (बॉबी) सावंत.