(रत्नागिरी)
कोकण रेल्वे पोलिसांनी धावत्या रेल्वेतून चार कोटीहून अधिक सुवर्णलंकाराची चोरी करणाऱ्या चौकडीला जेरंबद केले आहे. संदीप भोसले (४०, सांगली), अक्षय चिनवाल (२८, खानापूर बेळगाव), अर्चना उर्फ अर्ची मोरे ( नवी मुंबई, ४२) व धनपत बेड (४४, मुंबई) अशी संशयितांची नावे आहेत. महाराष्ट व कर्नाटक पोलिसांच्या सहकार्याने कोकण रेल्वे पोलिसांनी या धाडसी चोरीचा अखेर पर्दाफाश करताना चोरटयांना गजाआड केले आहे.
कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे उपअधिक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वरील कामगिरी केली. २ मे रोजी काणकोण रेल्वे स्थानकावर चोरीची घटना घडली होती. मुंबईतील नागपाडा येथील अशोक आर हे तक्रारदार आहेत. ते मुंबई येथील मधु ओनामेन्टस मध्ये ऑफिस बॉय म्हणून कामाला आहेत. आपले कर्मचारी संपत जैन यांचे चार कोटी रुपये किमंतीचे सात किलो सोने ( बांगडया) ट्रॉली बॅग मध्ये घेऊन ते पनवेलहून तिरुवनतपुरम येथे गांधीधाम तिरुनवेली हमसफर सुपर फास्ट रेल्वेतून प्रवास करीत होते. काणकोण येथे क्रॉसिंगमुळे रेल्वे थांबली असता, त्याचे सुवर्णलंकार चोरीला गेले होते.
या प्रकरणी मागाहून पोलिसांत तक्रार नोंद झाल्यानंतर कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस अधिक्षक गुरुदास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक गुरुदास कदम, पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास कामाला सुरुवात केली होती. याप्रकरणी सुगावा शोधत पोलिसांनी सांगली येथे जाउन संदीप भोसले व अक्षय चिनवाल यांच्या मुसक्या आवळल्या. २८ जून रोजी पोलिसांनी वरील कारवाई केली. संशयिताकडील दोन महारगडया कार व दाेन मोबाईल जप्त करण्यात आले. नंतर त्यांना गोव्यात आणून काणकोणच्या प्रथमवर्ग न्यायालयापुढे उभे केले असता, त्यांना सात दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे.