(मुंबई)
मुंबईच्या साकीनाका परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रिक्षातून प्रवास करत असतानाच प्रियकर आणि प्रेयसीमध्ये वाद झाल्यानंतर ऑटो-रिक्षातच प्रियकराने महिलेचा गळा चिरला आणि नंतर त्याच धारदार शस्त्राने स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केला. साकीनाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना दत्त नगरमधील खैरानी रोडवर घडली. पंचशीला जमादार (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे.
प्रियकराने केलेल्या हल्ल्यात ३० वर्षीय प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत त्याला अटक केली. दीपक बोरसे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ३० वर्षीय विवाहित महिलेचं आपल्या पतीसोबत पटत नसल्याने ती संघर्षनगर येथे आपल्या आईकडे राहत होती.
मृत महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. आरोपी दीपक बोरसे यांच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आरोपी आणि त्याची प्रेयसी साकीनाका परिसरातील खैरानी रोड येथून एका रिक्षातून जात होते. रिक्षातच त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दीपकने महिलेच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले.या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर बोरसे याने त्याच धारदार शस्त्राने स्वतःवर वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सफल न झाल्याने त्याने घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिकांनी पोलिसांना कळवल्यावर तात्काळ तपासाची चक्रे फिरवत त्याला अटक केली. दोघांनाही जवळच्या रुग्णालयात नेले असता महिलेला मृत घोषित करण्यात आले. आरोपीवर उपचार करण्यात आले.