(राजापूर / दीपक म्हसकर)
बैलगाडा शर्यत हा केवळ मनोरंजनाचा विषय राहिलेला नाही तर राज्याची परंपरा आणि शर्यतीबद्दल सर्वसामान्यांना प्रेम देणारे दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून मधुकरराव गोमणे ओळखले जातात. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील होळीचा मांड धामणपे येथे बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रम होणार आहे. ही बैलगाडी शर्यत मधुकरराव गोमणे यांनी पुरस्कृत केली असून स्पर्धा रविवार दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. विना फटका काठी लाठीचा प्रयोग ही अट प्रत्येक स्पर्धकाला घातली गेली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे राज्यस्तरीय स्पर्धा बंद होत्या. यावेळी मात्र धामणपे गावात प्रचंड उत्साह असून बैलगाडा शर्यतीचा धुरळा, होळीचा मांड, धामणपे गावात उडणार आहे. तर शर्यतींचा हा थरार अनुभवण्यासाठी मुंबईकर चाकरमानीही निघाले आहेत.
या बैलगाडी शर्यती संदर्भात धामणपे ग्राम विकास मंडळ, मुंबईचे सरचिटणीस संजय तावडे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, बैलगाडा शर्यत यंदा कोरोना निर्बंधातून मुक्तता झाली असून न्यायालयाच्या नियम अटींचे पालन करीत या शर्यती पार पडणार आहेत. तर गावात बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी हजारोच्या संख्यने जनसमुदाय उपस्थित रहाणार आहे. या शिवाय बैलजोड्यांची संख्याही लक्षणीय असणार आहे. येथील वातावरण आणि तरुणांचा उत्साह हा बैलगाडा शर्यतीबद्दलचे प्रेम द्विगणीत करणारा असेल. असे सांगून तावडे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये बैलगाडी शर्यत किती लोकप्रिय आहे याचे मुर्तीमंत उदाहरण या शर्यतीवरून दिसून येणार आहे. हजारोंची बक्षिसे अन् लाखों रुपये किंमतीच्या बैलजोड्या गावात येणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून बैलगाड्या शर्यती ह्या पार पडलेल्या नव्हत्या. त्यामुळे यंदाच्या बैलगाडी शर्यतीचे एक वेगळेपण आहे. या दरम्यान धामणपे गावात आबालवृद्ध, तरूण युवकांची मोठी गर्दी होणार याचा अंदाज वर्तवला जात आहे. या बैलगाडी विजेतेपद पटकाविणाऱ्यांना
प्रथम क्रमांकाला 30 हजाराचे बक्षीस, तर द्वितीय क्रमांकाला 25 हजाराचे बक्षीस तर तृतीय क्रमांकाला 20 हजाराचे बक्षीस व मानाची ढाल देण्यात येणार आहे. चौथ्या क्रमांकापासून ते नवव्या क्रमांकापर्यंत रोख पारितोषिके व मानाची ढाल देण्यात येणार आहे. बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यापासून नियम-अटींची पूर्तता करीत या शर्यती पार पडल्या जाणार आहेत.
शर्यतीच्या ठिकाणी लाखोंची उलाढाल होणार आहे. तर बैलजोडीला पुन्हा महत्व प्राप्त होणार आहे. शर्यतीसाठी खिलारी बैल जोडीला मागणी असते. त्यामुळे खिलारी बैलजोडीच्या किंमती ह्या लाखोंच्या घरात गेल्या आहेत. पुन्हा बैलजोडीला महत्व प्राप्त झाले आहे. अशी माहिती धामणपे ग्रामविकास मंडळ मुंबईचे सरचिटणीस
संजय शांताराम तावडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी शर्यतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.