(खेड/ईकबाल जमादार)
मुक्या जनावरांना आपण जीव लावू त्याप्रमाणे तीही आपल्याशी तेवढ्याच इमानदारीने वागत असतात… प्रसंगी आपला जीव देण्यासाठीही तयार असतात, हे एका नुकत्याच घडलेल्या घटनेवरून दिसून आलं आहे. काळीज पिळवटून टाकणारी घटना चिपळूण आलोरे येथे घडली आहे.
चिपळुणात कोळकेवाडी धरणात पोहण्यासाठी गेलेले 4 जण बुडाल्याची घटना बुधवारी घडली. त्यातील दोघांना वाचवण्यात यश आले व एका मुलीचा मृतदेह सापडला आहे. परंतु सुजय गावठे हा अद्याप बेपत्ता आहे. ज्यावेळी पोहायला हे सर्व गेले, त्यावेळी सुजयने कॅप्सर नावाच्या कुत्र्याला आपल्यासोबत घेतले होते. आपले मित्र धरणात बुडताहेत हे पाहिल्यावर सुजयने धरणात उडी घेतली. मात्र सुजय धरणात बुडतोय, गटांगळ्या खातोय हे कॅप्सरने पाहिल्यावर त्याच्या दिशेने धाव घेतली. त्याला वाचवण्यासाठी तो जोरजोरात भुंकू लागला. आजूबाजूच्या लोकांना तो या दिशेने येण्यासाठी ओरडत होता, बराच वेळ तो सैरभर धावत होता. शेवटी त्याने मालकाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मालकाच्या दिशेने तो पोहताना भुंकत होता. काही अंतरावर गेल्यानंतर सुजय त्याला दिसेनासा झाला. बऱ्याच वेळ तो शोध घेत होता. मात्र त्याच्या प्रयत्नाला यश आले नाही. शोधून शोधून तो शेवटी तांबडवाडी भाग येथे बाहेर पडला. बराच वेळ तो काठावर उभा राहून मालकाचा शोध घेत होता. शेवटी सुजयच्या नातेवाईकांनी त्याला घरात नेले. घरामध्ये गेल्यानंतर तो शांत होता. त्याची नजर मालकाला शोधत होती. हताशपणें तो जमिनीवर दोन पायांवर मान ठेवून बसला होता. घरच्या मंडळीनी त्याला जेवण खाऊ घातलं परंतु त्याकडे त्याने पाहिलेही नाही.
दुसऱ्या दिवशी पुन्हा शोधकार्याला सुरुवात झाली. तेव्हा तो पुन्हा घटनास्थळावर गेला. मालक कुठे दिसत नाही म्हणून तो व्याकुळ झाला होता. बराच वेळ शोध घेऊनही सुजय सापडला नसल्याने त्याला पुन्हा घरी आणण्यात आले. त्याचा घटनास्थळावरून पायच निघत नव्हता. घरात आणल्यानंतर सुजयच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या या कॅप्सरने अंगणात मान टाकली आणि विरह सहन न झाल्याने त्याने आपला जीव सोडला.
कॅप्सरच्या मालका प्रतीच्या प्रेमाने सारेच भाऊक झाले. त्यांनाही अश्रू अनावर झाले. आपल्या मलकावरच्या या प्रेमाची ही गोष्ट सगळीकडे चर्चिली जात आहे.