(रत्नागिरी / प्रतिनिधी)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत मत्स्य महाविद्यालय शिरगांव, रत्नागिरी येथे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांतर्गत धरणामध्ये पिंजऱ्यातील मत्स्यबीज संगोपन आणि व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन झापडे धरण येथे करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन झापडे ता. लांजा येथील फणस उत्पादक शेतकरी श्री. हरिश्चंद्र देसाई तर प्रमुख पाहुणे कोंड्ये येथील प्रगतशील शेतकरी श्री. मधुकर पल्ये हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. बी. आर चव्हाण, प्रकल्प समन्वयक तथा विभाग प्रमुख मत्स्य अभियांत्रिकी विभाग मत्स्य महाविद्यालय शिरगाव यांनी भुषविले. डॉ. चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणात उपस्थित लाभार्थीना मार्गदर्शन करताना पिंज-यांतील मत्स्य संवर्धन तंत्रज्ञान किफायतशीर असून शेतक-यांचे सामाजिक आर्थिक जिवनमान उंचवण्यासाठी शाश्वत उपजिविकीचे साधन आहे असे प्रतिपादन केले. व पिंजऱ्यातील मत्स्य संवर्धन तंत्रज्ञान या विषयी उपस्थित प्रशिक्षणार्थीना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी डॉ. पी. ई. शिनगारे सहयोगी अधिष्ठाता मत्स्य महाविद्यालय शिरगाव तसेच डॉ. एस. डी. नाईक विभाग प्रमुख मत्स्य संवर्धन यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देण्यात आली.
याप्रसंगी त्यांनी सहभागी लाभार्थीना मार्गदर्शनपर भाषणामध्ये या कार्यशाळेमधून मिळणाऱ्या तंत्रज्ञानातून आपण आपला आर्थिक स्तर उंचवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले. डॉ. एस. डी. नाईक, विभागप्रमुख, मत्स्यसंवर्धन विभाग, यांनी गोडया पाण्यात पिंज-यांतील मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञान अवलंबण्यास वाव असून, सदर तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे प्रसार व प्रचार केल्यास मत्स्य उत्पादन वादसाठी पर्याय होऊ शकतो, असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकल्प उपप्रमुख डॉ. एस. एस. देशमुख, तर आभार प्रदर्शन कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख व प्रकल्प उपप्रमुख डॉ. आनंद हणमंते यांनी केले या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी प्रकल्प उप प्रमुख डॉ. एस. के. सदावर्ते सहयोगी प्राध्याक तसेच डॉ. हरिश धमगाये सहयोगी प्राध्याक मत्स्य महाविद्यालय शिरगाव डॉ. आनंद हणमंते, डॉ. संदीप देशमुख आणि सौरभ सनगरे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास लांजा तालुक्यातील प्रकल्पातील एकुण २० लाभार्थी उपस्थित होते.