(नागपूर)
बुद्धाचे तत्वज्ञान विश्वकल्याणाचे आहे. बुद्धाने दिलेले पंचशीलाचे तत्त्व जगाच्या कल्याणाचे आहे. हाच समता आणि बंधुतेचा आधार आहे. हाच धम्म स्वीकारून बाबासाहेबांनी या देशातील जनतेला सामाजिक, आर्थिक दृष्टीने न्याय मिळवून दिला. बाबासाहेबांच्या कार्याची तुलना जगातील अमेरिकेतली मार्टिन ल्यूथर किंगसोबतच होऊ शकते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. पवित्र दीक्षाभूमीवर बुधवारी ६६ व्या धम्मप्रवर्तन दिनाच्या मुख्य समारोहात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
बाबासाहेबांनी सामाजिक बदल आणि शैक्षणिक विकास यावर भर दिला होता. यामुळे मोठे परिवर्तन झाले. ही दीक्षाभूमी या परिवर्तनाचा केंद्रबिंदू असून आम्हा सर्वांची प्रेरणाभूमी आहे. बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करण्याची आज खरी गरज आहे. तसेच दीक्षाभूमीला अतिरिक्त जागा देण्याचा विषय आम्ही केंद्रीय स्तरावर मांडून त्यावर लवकर निर्णय घेऊ असे मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात तथागतांचा बुद्ध धम्म देऊन या देशातील जनतेला प्राचीन संस्कृतीशी जोडले. बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध धम्म हा वैश्विक धम्म आहे. त्याचे अनुभव देशविदेशात भेटी दिल्यानंतर घेतला. दीक्षाभूमीच्या विकासाचा १९० कोटींचा आराखडा येत्या १५ दिवसांत मंजूर करु. दीक्षाभूमी सध्या ब वर्ग पर्यटन केंद्र असून ते अ वर्ग करावे यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु, असा शब्द त्यांनी यावेळी दिला.