चिपळूण : चिपळूण तालुक्यातील देवपाट येथील धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांपैकी एकाचा फोटो काढताना पाय घसरल्याने चाळीस फूट उंचीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुरेंद्र भैरव श्रीवास्तव (25, मुंबई) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना 19 मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिपळुणातील देवपाट येथील धबधब्यावर फिरण्यासाठी दोन तरूण गेले होते धबधब्याच्या किनाऱ्यावर दगडावर उभे राहून फोटो काढत असताना अचानक एकाचा पाय घसरल्याने तो 40 फूट खोल उंचीवरून पडला. हा प्रकार दुसऱ्या मित्राच्या समोरच घडत होता. मात्र त्याला पोहता येत नसल्याने त्याने धबधब्यात मित्राला वाचवण्यासाठी उडी घेतली नाही. तोपर्यंत धबधब्याच्या पाण्यात बुडून मित्राचा मृत्यू झाला होता.
या घटनेची खबर मंगेश गोवेकर (47 चिपळूण) यांनी सावर्डे येथील पोलीस स्थानकात दिली.