(मुंबई)
शिवसेना पक्षावर वर्चस्व कुणाचे आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावर अधिकार कुणाचा, या दोन वादाच्या मुद्यावर निवडणूक आयोगापुढील सुनावणीला आक्षेप घेणारी शिवसेनेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दाखल करून घेतली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा एक मोठा दिलासा मानला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या पीठासमोर १ ऑगस्टला या याचिकेवर सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्तापेचावर शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर देखील याच दिवशी एकत्रित सुनावणी होईल.
राज्यातील सत्तापेचासोबतच पक्षाचे भवितव्यही या सुनावणीवर अवलंबून असणार आहे. शिवसेना पक्षावर आणि निवडणूक चिन्हावर कोणाचा दावा खरा आहे, हे तपासण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला नोटीस बजावून ८ ऑगस्टपर्यंत योग्य कागदपत्रांसह बाजू मांडण्यास सांगितले आहे, परंतु निवडणूक आयोगाचा हा आदेश असंवैधानिक आणि घाईघाईने घेतलेला निर्णय असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. शिवसेना सरचिटणीस सुभाष देसाई यांनी ही याचिका दाखल केली आहे.