कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील रुग्णांची संख्या ही तब्बल दोन कोटींवर गेली आहे. याच दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. जंगलचा राजा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे.
हैदराबादेतील नेहरू जूलॉजिकल पार्कमधील 8 आशियाई सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार नेहरू जूलॉजिकल पार्कमधील अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे. RT-PCR चाचणी केल्यानंतर सिंह कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB)ने आतापर्यंत सँपल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिलेली नाही.
रिपोर्टनुसार, CCMB या सँपलची जीनोम सिक्वेंसिंग पद्धतीने विस्तृत तपासणी करतील. त्या माध्यमातून सिंहांना माणसांपासून कोरोनाचा संसर्ग झाला आहे का? याचा तपास केला जाईल. इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी अधिकाऱ्यांना सावधगिरी बाळगण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर तातडीने कोरोना संसर्गित सिंहांवर उपचार सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. प्राणीसंग्रहलयातील अधिकाऱ्यांकडून सिंहांच्या फुफ्फुसाचा सिटी स्कॅन केला जाण्याची शक्यता आहे. जेणेकरुन त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला आहे का याची माहिती मिळणार आहे.