(नवी दिल्ली)
चीनमध्ये कोरोना संसर्गाने हाहाकार माजला असून एकाच दिवसात या देशात ३७ मिलियन अर्थात ३.७ कोटी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या आठवड्यातील एका दिवसांत झालेली ही सर्वाधिक नोंद आहे.
ब्लुमबर्गच्या वृत्तानुसार, या वर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या २० दिवसात २४८ मिलियन लोक संसर्गबाधित झाले होते. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य कमिशनची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीतील मिनिट्स चीनच्या टॉपच्या अधिका-यांकडून ब्लुमबर्गला प्राप्त झाले आहेत, याद्वारे त्यांनी वृत्त दिलं आहे. ही रुग्णसंख्या जगभरातीस सर्वात मोठी असल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
चीनमध्ये आतापर्यंत २४.८० कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली असून ही संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या १८ टक्के इतकी भरते. त्यामुळे आता भारत सरकारही अलर्ट मोडवर आले असून, वेगवेगळ्या उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांकडून याबाबत एक पत्र राज्यांना पाठवण्यात आले आहे. आगामी काळात कोणती खबरदारी घेण्यात यावी? याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
येत्या काळात राज्यात अनेक सणोत्सव आहेत. या काळात कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो, त्यामुळे योग्य ती काळजी घेण्यात यावी असं या पत्रात म्हटलं आहे. ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्ष आढळतील त्याची तातडीने चाचणी करण्यात यावी. आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, हात वेळोवेळी स्वच्छ धुवावेत, आवश्यक त्या ठिकाणी मास्कचा वापर करावा आणि सुरक्षित अंतर ठेवावे अशा अनेक सूचना या पत्राद्वारे राज्यांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, भारतामध्ये ओमिक्रॉनच्या BF.7 या सबव्हेरियंटचे चार रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे भारत सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. केंद्र सरकार देशातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेऊन असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.