(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रिक्षा प्रवासादरम्यान रिक्षा चालकाने एका तरुणीशी असभ्य अश्लील वर्तन केले. त्या तरुणीने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टने शहरात खळबळ उडाली होती. पोस्टच्या अनुषंगाने रत्नागिरी पोलिसांनीच पुढाकार घेत त्या तरुणीशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांना संपूर्ण प्रकरण समजून आले व पोलिसांनी आरोपीच्या दीड तासात मुसक्या आवळल्या.
कॉलेजवयीन तरुणी घरी परतण्यासाठी जयस्तंभ येथे गाडीसाठी उभी होती. या थांब्यावर कुवारबावच्या दिशेने जाणारा संशयित रिक्षाचालक अविनाश म्हात्रे आला असता, त्याच्या रिक्षात तरुणी बसली. जयस्तंभ ते कुवारबाव असा प्रवास करीत असताना रिक्षाचालकाचे मागे बसलेल्या तरुणीसोबत असभ्य अश्लील वर्तन सुरू होते. ही घटना १३ जून २०२३ रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली. तरुणीने भीतीपोटी सदर बाब कोणालाही सांगितली नव्हती. मात्र १४ जून २०२३ रोजी मुलीच्या कुटुंबीयांनी व मित्र परिवाराने थेट पोलिस ठाणे गाठले आणि सर्व प्रकार पोलिसांच्या समोर उघड झाला. रत्नागिरी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रिक्षाचालकाला पकडण्यासाठी दोन पथके स्थापन केली. दोन्ही पथकांच्या माध्यमातून पोलिसांनी संशयीत रिक्षाचालकाचा शोध सुरू केला. रत्नागिरी पोलिसांनी संशयीत रिक्षा चालकाच्या दीड तासांमध्ये मुसक्या आवळल्या असून अविनाश म्हात्रे (अंदाजे वय ३५) असे विकृत रिक्षाचालकाचे नाव आहे. संशयित रिक्षाचालकाला शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून त्याची रिक्षा जप्त करून कलम 354, 354 अ – लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिस संशयित आरोपीची कसून चौकशी करीत आहेत.
त्याच रिक्षातून फिरून आले पोलिस…
पोलिसांनी आरोपीचे LIVE लोकेशन ट्रेस करून संशयित आरोपी अविनाश म्हात्रे याच्या रिक्षात पोलीस बसले. आम्हाला मांडवी बीचला सोडा असे पोलिसांनी म्हात्रेला सांगितले. मांडवी बीचवर नजर फिरवून पोलीसांनी संशयित आरोपीच्या रीक्षासह अवघ्या दिड तासात पोलिस ठाण्यात हजर केले.
सोशल मीडियावर रत्नागिरीत पोलिसांचे होतेय कौतुक
आजवर सिनेमा किव्वा TV वर बघितल्याप्रमाणे सिंघम स्टाईल कारवाई रत्नागिरी पोलिसांनी स्थापन केलेल्या पथकाने करून दाखवली आहे. यामुळे शहरातील तरुणींनी सुटकेचा मोकळा श्वास तर घेतलाच आणि पोलिसांच्या धडक कारवाईने रत्नागिरी किती सुरक्षित आहे हे सिद्ध झाले. रत्नागिरी पोलिसांना समस्त भगिनींकडून मनापासून धन्यवाद आणि मानाचा मुजरा! अशा आशयाच्या पोस्ट फिरत असून रत्नागिरी पोलीसांचे कौतुक सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जात आहे.