(मुंबई)
काही दिवसांपूर्वी ‘आदिपुरुष’ या आगामी बहुचर्चित चित्रपटाच्या निर्मात्यांनी सर्व चित्रपटगृहात रामभक्त हनुमानाच्या नावाने एक सीट राखीव ठेवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता तर द काश्मीर फाईल्स आणि कार्तिकेय-२चे निर्माता अभिषेक अगरवाल यांनी ‘आदिपुरुष’ची १० हजार तिकिटे खरेदी करून करण्याची घोषणा केली आहे.
‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास यांची भूमिका असलेला बिग बजेट आदिपुरुष हा ओम राऊत दिग्दर्शित चित्रपट १६ जून रोजी पाच विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित असल्याने भक्तिभावनेतून कारण देत ‘द काश्मीर फाईल्स’चे निर्माता अभिषेक अगरवाल यांनी तब्बल १० हजार मोफत तिकिटे वाटण्याचे जाहीर केले आहे.
तेलंगणातील सरकारी शाळा, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना ही मोफत तिकिटे वाटली जाणार आहेत. ‘आदिपुरुष हा आयुष्यातून एकदाच अनुभवावा असा भव्यदिव्य चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी साजरा केला पाहिजे. प्रभू श्रीराम यांच्याप्रती असलेल्या भक्तीसाठी मी चित्रपटाची दहा हजार तिकिटे खरेदी करून तेलंगणातील सरकारी शाळा, वृद्धाश्रमांमध्ये आणि अनाथाश्रमांमध्ये वाटणार आहे. तिकिटे मिळवण्यासाठी गुगल फॉर्म भरा’, असे ट्विट या निर्मात्याने केले आहे. अभिषेक अगरवाल यांच्या या औदार्यावर अभिनेता प्रभास याने ट्विट करताना म्हटले की, हे खरोखरच कौतुकास्पद पाऊल आहे.